राजापूर बाजारपेठेत असणारे अतिक्रमण त्वरीत हटवावे, त्यासाठी जर पोलिस बंदोबस्ताची आवशक्यता असेल तर तो नक्कीच देण्यात येईल असे पत्र राजापूर पोलिसांनी राजापूर नगरपरिषदेला दिलेले असतानाही अद्यापही राजापूर नगर परिषद हे अतिक्रमण हटवले नाही. नाव घेत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
राजापूर बाजारपेठेतील अनेक व्यापारी आपले सामान राजरोसपणे रस्त्यावर ठेवत असल्याने व झड्या दिवसेंदिवस वाढवत असल्याने बाजारपेठेत एखादी अप्रिय घटना घडल्यास बाजारपेठेत अग्निशमन गाडी तरी जाईल का? त्यावेळी राजापूर नगर परिषद फक्त बघ्याची भूमिका घेणार का? त्यावेळी होणाऱ्या परिणामाला जबाबदार कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतुन विचारण्यात येत आहे.
आधीच निमुळती असणारी बाजारपेठ आता अतिक्रमाणामुळे घुसमटत आहे. बाजार पेठेतील व्यापारी बहुतांशी आपल्या दुकानातील सामान रस्त्यावर ठेवत असल्याने मुळात अरुंद असणारी बाजारपेठ आणखीनच निमुळती झाली आहे. त्यातच व्यापारी वर्गाने आपल्या दुकासमोरील पायऱ्या भर रस्त्यातच घातल्या असुन झडीचे छप्परही दोन्ही बाजूंनी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यातच राजापूर बाजारपेठेतून वीज वाहिण्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एखादी आगीसारखी अप्रिय घटना घडल्यास ती आग विझवण्यासाठी कसे प्रयत्न करणार. बाजारपेठेत राजरोसपणे झालेले अतिक्रमण पाहता बाजारपेठेत अग्नीशमन बंबही जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असताना रात्रीच्या वेळी बाजारपेठेत पोलीस गस्त होणे गरजेचे आहे. मात्र पोलीस वाहन ही या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत जाऊ शकत नाही.
जवाहर चौकापासुन अगदी मच्छीमार्केटपर्यंत संपूर्ण बाजारपेठेत सगळीकडे हे अतिक्रमण असल्याने बाजारातून चालणेही कठीण बनले आहे. तर शिवाजी पथ रस्ताही आजच्या घडीला अतिक्रमणाने व्यापलेला आहे. राजापूर नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करुन मच्छीमार्केट बांधलेले असताना अनेक मासळी विक्रेते या शिवाजी पथावर बसत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजापूर बाजारपेठेतून रोज सकाळी राजापूर नगर परिषदेची कचरा संकलन गाडी कचऱ्याचे संकलन करण्यासाठी बाजारात येत असते. त्या गाडीवर कर्मचारी कचरा संकलन करत असतात. मात्र दुकानांसमोर असणाऱ्या झड्या या कर्मचाऱ्यांच्या डोक्याला लागत असल्याने जर अचानक एखादा अपघातही घडु शकतो. मात्र या सगळ्याबाबतीत राजापूर नगरपरिषद हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊन शांत असल्याने सर्वसामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हे अतिक्रमन हटवताना राजापूर नगर परिषद प्रशासनाला राजकिय पुढाऱ्यांचा कायम हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे. काही आजी माजी लोकप्रतिनिधी या अतिक्रमनाला पाठीशी घालत असल्याने राजापूर नगरपरिषद अळीमिळी गुप चिळी या भुमिकेत असल्याने सर्वसामान्य जनतेतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता राजापूर पोलिसांनी दिलेल्या या पत्रानंतर तरी राजापूर नगर परिषद हे अतिक्रमन हटवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.