File Photo : Raosaheb Danve
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे राज्याचे संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हेदेखील वाचा : गृहमंत्री म्हणून काम करताना शिव्याच जास्त खाव्या लागतात…; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली. तसेच भाजपचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली.
बावनकुळे म्हणाले, आमच्या कोअर कमिटीच्या 19 सदस्यांकडेही वेगवेगळ्या समितीची जबाबदारी देण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक आम्ही संघटनात्मक पद्धतीने महायुतीला बरोबर घेऊन पुढे जाणार आहोत. या निवडणुकीचा विजय मोठा कसा राहील? यासाठी आम्ही योजना तयार केली आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणार
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हर्षवर्धन पाटील हे आमचे नेते आहेत. समरजितसिंह घाटगे हे देखील आमचे नेते होते. मात्र, महायुतीत विद्यमान आमदार असतील त्या जागा त्या-त्या पक्षाला सोडाव्या लागणार आहेत. त्यामुळे तेथील भाजपच्या इच्छुकांची नाराजी आहे.
पक्षातून कोणीही बाहेर पडणार नाही याची काळजी घेऊ
आमच्याच काही लोकांनी दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे. त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अशा पद्धतीचा पेच जास्त ठिकाणी नाही. एक ते दोन ठिकाणी आहे. मात्र, पक्षातून कोणीही बाहेर पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेदेखील वाचा : भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ तर राष्ट्रवादी…; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याच वक्तव्य