महादेव जानकर यांचं पुण्यातून मोठं विधान; म्हणाले, आमची लढाई...
पुणे : आमची राजकीय लढाई ही शोषित बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आहे. त्यासाठी राजकीय सत्ता ही महत्वाची आहे. सत्तेच्या चाव्या बहुजन समाजाच्या हातात येण्यासाठी कायम संघर्ष करत राहू, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने गंजपेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित युवा संघर्ष निर्धार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे अध्यज्ञ, माजी राज्यमंत्री बच्चू कडू उपस्थित होते. या कार्यक्रमात अनिल पवार, विक्रम ढोणे, दत्तकुमार खंडागळे, सौरभ हटकर, नितीन आंधळे यांचा युवा संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जानकर म्हणाले, शेतकरी- बहुजन वर्गाचे प्रश्न मोठे आहेत. त्यावर सातत्याने आवाज उठवला गेला पाहिजे. हे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय सत्तेची गरज आहे. मी, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी २००९ मध्ये रिडालोसचा प्रयोग केला होता. पुढील काळात २०१४ च्या निवडणुकांपुर्वी गोपीनाथ मुंडे साहेबांनी छोट्या पक्षांचे महत्व ओळखून आम्हाल जवळ केले. छोट्या पक्षांच्या सहकार्यामुळेच २०१४ ला सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतरच्या काळात आम्हाला काही काळ सत्तेत काम करण्याची संधी मिळाली. माझ्याकडे पशुसंवर्धन मंत्री असताना राज्यातील सर्वाधिक दूध दर मी दिला होता. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या विचारांचे आमदार मोठ्या संख्येने विधीमंडळात गेले पाहिजेत. त्यादृष्टीने आगामी काळात संघर्ष करत राहू.
बच्चू कडू म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मात्र त्याकडे सरकारचे लक्ष नाही. जातीजातींत भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. हा कावा सामान्य लोकांनी ओळखला पाहिजे. आम्हाला जरी सत्तेत सहभागी होता आले नाही तर सत्ता सर्वसामान्यांच्या दारात नेण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
प्रास्ताविक रासपचे राज्य सरचिटणीस अजितकुमार पाटील यांनी केले. यावेळी सुधाकर जाधवर, शार्दूल जाधवर, एस. एल. अक्कीसागर रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते, स्वाभिमानीचे युवक अध्यक्ष अमर कदम, ज्ञानेश्वर सलगर, अंकुश देवडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.