रत्नागिरी जिल्ह्यात ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची देयके थकीत (फोटो सौजन्य-X)
चिपळूण: सांगली जिल्ह्यातील एका ठेकेदाराने जल जीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिल न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत व सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या थकीत कोट्यवधी देयकांच्या बिलांचा देखील प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यावर देखील आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांनी दिली आहे.
घरगुती नळ जोडणीद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी हा उद्देश घेऊन केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १२०० कोटींच्या खर्चाचा कार्यक्रम आखण्यात आला. त्यानुसार अनेक कामेही मार्गी लागली. मात्र, जिल्ह्याला दीड वर्षात केवळ १५ ते २० टक्केच निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ठेकेदार हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे देयकां अभावी कामेही अर्धवट राहिल्याने गावा-गावात पाणी- पाणी करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत जल जीवन मिशन योजनेला शासनाकडूनच हरताळ फासला जात आहे.
थकित देयकांसाठी शासन- प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून देखील बिले मिळत नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. ठेकेदारांनी कामांसाठी बँकांकडून काढलेले कर्ज देखील थकीत राहिल्याने कर्जावर दिवसेंदिवस व्याज वाढत असून कामे देखील परवडत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे थकीत देयके लवकरात लवकर अदा करावीत, अशी मागणी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कामे केलेल्या ठेकेदारांनी मागणी केली असून आमच्यावर देखील आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असा संतप्त सवाल या ठेकेदारांच्या संघटनेने उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत देखील कामे केलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांची सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे २०० कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले सुमारे १५ ते २० टक्केच येत असल्याने उर्वरित फरक काढण्याचे ठेकेदारांसमोर आव्हान उभे राहिले आहे. ही बिले मिळावी यासाठी चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेने गेल्या सहा महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत मार्चपर्यंत बिले अदा करावीत अशी मागणी केली होती. तर आता पुन्हा याच महिन्यात रत्नागिरी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच लोकप्रतिनिधींना देखील निवेदन देण्यात आली आहेत. मात्र या थकीत देयकांसंदर्भात कोणती कार्यवाही होताना दिसत नाही. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात ठेकेदारांच्या थकीत देकांसंदर्भात कोणताही निर्णय न झाल्याचे समोर येत आहे.
यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांनी नाराजी व्यक्त केली असून आम्हा ठेकेदारांवर देखील आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असा सवाल चिपळूण तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेशशेठ चिपळूणकर यांनी उपस्थित केला आहे. सांगली येथील ठेकेदाराने थकीत देयकांसंदर्भात आत्महत्या केल्याने यातून तरी शासन-प्रशासन धडा घेईल का? असा सवाल ठेकेदारांमधून उपस्थित होत आहे.