File Photo : Vidhan Sabha
जयसिंगपूर : राज्यातील वडार समाजाचा बांधकाम कामगार योजनेमध्ये समावेश होऊन समाजाला योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात करून समाजाला दिलासा दिला आहे. वडार समाजाप्रती आमदार डॉ. माने यांनी दाखवलेली आत्मियता लक्षात घेऊन शहरातील समाज बांधवांनी त्यांचा यथोचित गौरव करून कृतज्ञता व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनांद्वारे लाभ दिला जातो. यामध्ये गृहोपयोगी वस्तू संच, सेफ्टी किट, घरकुल योजना, शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरोग्याच्या सुविधा, विमा इत्यादी सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचा लाभ राज्यातील अनेक बांधकाम कामगारांना होत आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडित जवळपास तेरा प्रकारचे कामगार या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये बांधकाम व्यवसायाला लागणारा मुरूम, खडी, दगड असा कच्चा माल पुरवणाऱ्या राज्यातील वडार समाजाला या योजनेचा लाभ मिळत नाही.
बांधकाम व्यवसायाची सुरुवात या समाजापासूनच होते. वडार समाजाला बांधकाम व्यवसायाचा पाया म्हणावा लागेल. या व्यवसायाचे मूळ असणारे या समाजाची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊ शकत नसल्याने वडार बांधवांचे मोठे नुकसान होत आहे. दगड खाणीमध्ये काम करत असताना वडार समाजातील कामगारांना अनेक आरोग्याच्या आणि असुरक्षिततेच्या समस्या उद्भवतात. मात्र, त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून, सुद्धा बांधकाम कामगार म्हणून समावेश नसल्याने अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.
वडार समाजाचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी होऊन त्यांना बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी आमदार डॉ. माने यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. यामुळे समाजाला न्याय मिळायची अशा निर्माण झाली आहे. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वीय सहाय्यक सुहास राजमाने, भाजपा हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, आशा गाडीवडर, स्वाती भापकर यांच्यासह वडार समाज बांधव उपस्थित होते.