ठाणे ते देवगड थेट एसटी बससेवा सुरु होणार; आमदार फाटक यांच्या मागणीची परिवहनमंत्र्यांकडून तात्काळ दखल
गुहागर : सध्या ठाणे ते देवगड या मार्गावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नोकरी-व्यवसाय करणारे, तसेच कोकणात ये-जा करणारे चाकरमानी प्रवास करत असतात. या मार्गावर थेट एसटी बससेवेची सुविधा नाही. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ दखल घेत एसटी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बसफेरी त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार फाटक यांनी याबाबत एक निवेदनही दिले आहे. त्यात त्यांनी ठाणे ते देवगड या मार्गावर बससेवा नाही. त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ठाणे ते देवगड थेट एसटी बस सेवा सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या बससेवेमुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येईल आणि कोकणातील नागरिकांना या सेवेचा मोठा लाभ होईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उद्दिष्ट हे राज्यातील जनतेला नियमित व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे आहे. नागरिकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून ठाणे ते देवगड अशी नवीन एसटी बस सेवा सुरू करण्याबाबत योग्य ते सहकार्य करावे, असे म्हटले आहे.
आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून निवदेनाद्वारे जी मागणी केली गेली, याची तात्काळ दखल परिवहनमंत्र्यांनी घेतली. त्यानुसार, आता ठाणे ते देवगड थेट एसटी बस सुरु केली जाणार आहे. या नव्या बससेवेचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे.
कोकणासाठी ज्यादा बसेस सोडल्या जाणार
कोकणात गणपती व शिमगा हे दोन मोठे सण आहेत. या सणांसाठी मोठ्या प्रमाणावर खासगी बसेस सुटतात. आता गणपती उत्सव येत आहे, पण जादा भाडे घेऊन भाविकांची व कोकणवासियांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी वेळीच दखल घेण्याची मागणी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी केली असता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाने ८ हजार ३०० बसेस घेतल्या आहेत.
प्रवासी बसेससाठी थांबे बांधण्यात येणार
पश्चिम आणि पूर्व उपनगरातून सणासुदीला आणि दररोज असंख्य एसटी व खासगी बसेस मुंबईच्या बाहेर रवाना होतात, पण यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीच्या जागा घेऊन प्रवासी बसेससाठी थांबे बांधण्यात येणार आहेत, असे सांगितले.
TASGAON SHINE ची जागतिक झेप; तासगाव-कवठेमहांकाळ MIDC साठी 1100 कोटींच्या गुंतवणुकीची स्वारस्यपत्रे






