
गणेशोत्सव 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या दररोज वाढत आहे. चारचाकी, एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स तसेच दुचाकी वाहनांमधून मोठ्या संख्येने नागरिक कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण, खेड, माणगाव आणि पुढील मार्गावर वाहनांची विशेष वर्दळ दिसून येत आहे.
Ganeshotsav 2026: कोकणात गणेशभक्तांसाठी ‘वार्ता विघ्नांची’; रेल्वे आरक्षणात अडथळे तर…
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रशासनाकडून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, महामार्गाच्या काही भागात सुरू असलेली कामे, अरुंद मार्ग आणि काही ठिकाणी पडलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणातील घरे सजू लागली असून बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मुंबई आणि उपनगरातून निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाला सध्या गणेशोत्सवाच्या उत्साहाचे स्वरूप आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच चाकरमान्यांची कोकणवारी सुरू झाली असून पुढील काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
एका बाजूला भरधाव वाहने आणि दुसऱ्या बाजूला स्थानिकांची वाहतूक, अशा जीवघेण्या परिस्थितीत अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यासाठी उभारण्यात येणारे पादचारी पूल अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. असल्याने नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेषतः मोठी गैरसोय होत आहे.