
आगामी निवडणुकीसाठी रत्नागिरीत बंडखोरी
हजारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा प्राथमिक अंदाज
ऐनवेळी शिवसेनेकडून पत्ता कट केल्याने अपक्ष अर्ज दाखल
रत्नागिरी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली होती. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती तसेच ठाकरे शिवसेना आणि अन्य घटक पक्षांची महाविकास आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. काही ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला आहे विशेषतः खेडमध्ये भाजपने आपण स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केल्यामुळे जिल्ह्यातील युती काही भागात तुटल्याची माहिती समोर येत आहे.
अनेकांना या निवडणुकीत इच्छुक असूनही पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्याने त्याने अखेरच्या क्षणी बंडखोरी केल्याचे चित्र आहे. सर्वच पक्षातून अशी बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे हे बंडखोर उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघार घेणार की आपले अर्ज कायम ठेवणार याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत अधिकृत उमेदवारी अर्जाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून अंतिम करण्यात येत होती. त्यामुळे जिल्हाभरात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या गटांसाठी सुमारे १००० पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
ऐनवेळी शिवसेनेकडून पत्ता कट; अपक्ष अर्ज दाखल
रत्नागिरी तालुक्यात माजी समाजकल्याण सभापती पशुराम कदम यांचा ऐनवेळी शिवसेनेकडून पत्ता कापण्यात आल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील यांनीही
शिवसेनेमधून गोळप पंचायत समिती गणासाठी अर्ज दाखल करीत शड्डू ठोकला आहे. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील २० पं.स. गणासाठी ५१ अर्ज आले असून जि.प.च्या १० गटांसाठी ३८ अर्ज दाखल झाले आहेत.
डॉ. पद्मजा कांबळे पहिल्या बिनविरोध उमेदवार
रत्नागिरी तालुक्यातील नाणिज पंचायत समिती गणामधून शिवसेनेच्यावतीने डॉ. पद्मजा संजय कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात कोणत्याच पक्षाने उमेदवार न दिल्याने त्या बिनविरोध झाल्या आहेत. महाराष्ट्रात त्या पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्या बिनविरोध उमेदवार ठरल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीकरित्ता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनी म्हणजेच बुधवारी संगमेश्वर तालुक्यामध्ये तब्बल ६५ अर्ज दाखल झाले. यात जिल्हा परिषद गटाकरिता १८ तर पंचायत समिती गणासाठी ४७ अर्ज दाखल झाले. यामुळे आजपर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या एकुण ७८ झाली आहे. यात जि.प. साठी २५ तर पं. स. साठी आता ५३ अर्ज झाले आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.