पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. त्यांच्या या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) केला जात आहे. असे असताना कसबा मतदारसंघ एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पण पोटनिवडणुकीत त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव झाल्याने विविध चर्चा सुरु आहेत.
कसबा पेठच्या पूर्व भागात 82 हजार मतदान
कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची फौज याठिकाणी प्रचाराला उतरली होती. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी सर्वच प्रकारे प्रयत्न केले होते. त्यामध्ये त्यांनी साम, दाम, दंड, भेद याचा वापरही केला होता. त्याचाच काहीसा फटका धंगेकर यांना बसल्याची चर्चा आहे. कसबा पेठ मतदारसंघाच्या पूर्व भागात 82 हजार मतदान झाले होते. या भागातून धंगेकरांना 50 ते 55 हजार मते मिळतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, या ठिकाणाहून धंगेकर यांना 48 हजार मते मिळाली आहेत.
धंगेकरांच्या बालेकिल्ल्यात रासनेंना चांगली मते
रासने यांनी धंगेकर यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ प्रभागातून अनपेक्षितरित्या चांगली मते मिळवली आहेत. तर, खडकमाळ-महात्मा फुले पेठ या प्रभागातून त्यांना म्हणावा तसा फटका बसला नाही. नाहीतर धंगेकर 15 ते 20 हजार मताधिक्याने निवडून आले असते, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
भाजपला प्रभाग क्रमांक 29 मधून आशा पण…
भाजपला प्रभाग क्रमांक 29 (नवी पेठ-पर्वती) मधून मोठी आशा होती. पण याठिकाणाहून भाजपला आघाडी घेता आली नाही. या प्रभागात भाजपचे चारही नगरसेवक आहेत. त्यापैकी धीरज घाटे यांना सभागृहनेते तर सरस्वती शेंडगे यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. घाटे हे कसब्यातून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती.
मतदारांना गृहीत धरल्याने बसला फटका
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 हा कायम आपला हक्काचा मतदार समजणाऱ्या भाजपला सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ या भागातील मतदारांनी पोटनिवडणुकीत अस्मान दाखविले. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा स्वत:चा प्रभाग असतानाही याठिकाणी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 14 हजार 526 मते मिळाली तर हेमंत रासने यांना या प्रभागातून केवळ 7 हजार 237 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे पेठांतील नागरिक म्हणजे हक्काचे मतदार म्हणून गृहीत धरणाऱ्या भाजपला सर्वांत मोठा फटका बसला.
कोणत्या प्रभागात किती मतं?
प्रभाग क्रमांक 15 (शनिवार पेठ-सदाशिव पेठ) – रविंद्र धंगेकर – 14,557 हेमंत रासने – 21,763
प्रभाग क्रमांक 16 (कसबा पेठ-सोमवार पेठ) – धंगेकर – 10,594 रासने – 6033
प्रभाग क्रमांक 17 (रास्ता पेठ-रविवार पेठ) – रविंद्र धंगेकर – 16,714 हेमंत रासने – 10,639
प्रभाग क्रमांक 18 (खडकमाळ-महात्मा फुले पेठ) – रविंद्र धंगेकर – 15,360 हेमंत रासने – 10,880
प्रभाग क्रमांक 19 (लोहिया नगर-कासेवाडी) – रविंद्र धंगेकर – 5793 हेमंत रासने – 4431
प्रभाग क्रमांक 29 (नवी पेठ-पर्वती) – रविंद्र धंगेकर – 10,176 हेमंत रासने – 8,498