पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात शासन दराप्रमाणे फी आकारणीस सुरुवात केली आहे. त्यामुळे फी वाढली आहे. रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले. तसेच मुलांना शालेय साहित्य देण्याचा विषय न्यायप्रविष्ट असून त्यातुनही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
महापालिकेचे सर्व रुग्णालये, दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा व औषध उपचाराच्या दरवाढीचा प्रस्ताव मागे घ्यावा आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी साहित्याची पारदर्शक पद्धतीने खरेदी करून विद्यार्थ्यांना तातडीने वाटप करण्याबाबत विविध सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. मागणीचे सविस्तर निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे की, शहरात 72 पेक्षा अधिक झोपडपट्ट्या आहेत. गोरगरीब कष्टकरी कामगारांची ही औद्योगिकनगरी आहे. या शहरातील गोरगरीब,कष्टकरी, नागरिक महापालिकेच्या 8 रुग्णालय व 29 दवाखान्यातून उपचार घेतात. हे उपचार या रुग्णांना अल्प दरात मिळतात. या रुग्णांमधील अतिगरीब रुग्णांच्या उपचाराचे आलेले बिलात नगरसेवक, आमदार, खासदार कार्यकर्त्यांच्या शिफारशीवर सवलत देण्यात येते.
वैद्यकीय सुविधांसाठी शासनाने निर्धारित केलेले सुधारित दर हे महापालिका रुग्णालय व दवाखान्या करिता लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय आहे. हा निर्णय लागू केल्यानंतर सुरू असणाऱ्या प्रचलित दरापेक्षा दुपटीने दरवाढ होणार आहे. देशातील कोविड महामारी, नोटबंदी, बेरोजगारी व प्रचंड महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना गोरगरीब वंचित घटकातील रुग्णांना महापालिका रुग्णालयच आपला जीव वाचवण्यासाठी आधार वाटतात. सन 2017 चा हा शासन निर्णय लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसताना सन 2022 मध्ये लागू करत आहात. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात असून हा मंजूर केलेला प्रस्ताव विखंडित करावा. निर्णय मागे घ्यावा.
[read_also content=”हॉटेल चालकाची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनलीमिटेड “दारू ऑफर” https://www.navarashtra.com/maharashtra/hotelier-offers-college-students-unlimited-liquor-nrdm-307027.html”]
महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या 40 हजार विद्यार्थ्यांना दरवर्षी शिक्षण विभागामार्फत पाठ्यपुस्तके, गणवेश, पी.टी. गणवेश, स्वेटर , रेनकोट, बूट -सॉक्स,दप्तर -कंपास,वह्या भूगोल – कार्यशाळा – चित्रकला वही इत्यादी शालेय साहित्य दिले जाते. मात्र, यावर्षी लोकनियुक्त नगरसेवक नसल्यामुळे निविदेचा वाद आणि टक्केवारीचा गोंधळ न होता प्रशासकीय कारभारात तरी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना सर्व साहित्य मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र शालेय पाठ्यपुस्तके वगळता इतर कोणतेही साहित्य विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे शालेय साहित्य स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने विनाविलंब खरेदी करून ते विद्यार्थ्यांना तातडीने द्यावे, अशी मागणीही निवेदनातून केली. या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही. तर, सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. रुग्णालयातील दरवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आश्वासन आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी सांगितले.