नागपूर : महागाईचा तडाखा सहन करणाऱ्या रेस्टॉरंट चालकांना व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपातीचा कोणताही दिलासा मिळालेला नाही. कंपन्यांनी केवळ 1 रुपयाने किंमत कमी केली आहे. व्यावसायिक असो की घरगुती सिलिंडर, नवीन वर्षात सिलिंडर स्वस्त होईल, अशी ग्राहकांची अपेक्षा होती. पण ती धुळीस मिळाली.
घरगुती सिलिंडरवर कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. परंतु व्यावसायिक सिलिंडरच्या किमती मात्र 1 रुपयाने कमी झाल्या. गेल्या महिन्यात 1933.50 रुपयांना विकला जाणारा व्यावसायिक सिलिंडर आता 1 रुपयाने घसरून 1932.50 रुपयांवर आला आहे. तर घरगुती सिलिंडरची किंमत 954.50 रुपयांवर कायम आहे. त्यात फारशी कपात न केल्यामुळे रेस्टॉरंट चालकांना अजूनही वाढलेल्या उत्पादन खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.
छोट्या-मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटचालकांच्या तोट्यात सातत्याने वाढ होत आहे. सरकारने नववर्षाची भेट दिली असली तरी ती थट्टा करणारी आहे. या महागाईचा फटका आता ग्राहकांनाही बसू लागला आहे.






