सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती! सोलापूरपासून मुंबई अन् बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरु
नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूर विमानसेवेमध्ये महत्त्वपूर्ण सुविधा मिळणार आहे. सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार आहे.
सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार
१५ ऑक्टोबरपासून सोलापूर ही सेवा सुरु होणार
पुणे/सोलापूर : प्रतिनिधी : सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे मोठी सोय होणार आहे.
याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ म्हणाले की, सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले .मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरु करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. ज्याला आता यश आले आहे. मुंबई आणि बंगलोर या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती मुरलधीर मोहोळ यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, ‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी,आमदार देवेंद्र कोठे आणि प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी हवाईसेवेसाठी पाठपुरावा केला .आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, “१५ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर – मुबई, सोलापूर बंगळुरु हवाईसेचे उध्दघाटन करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापुरकरांसाठी आनंदाची वार्ता दिली आहे,” असे सचीन कल्याणशेट्टी म्हणाले आहेत.