
वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड; प्रांत अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आलं निवडीचं पत्र
वडूज : अंतर्गत ठरलेल्या समझोत्यानुसार तत्कालीन नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते महेश खडके यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र प्रांत अधिकारी उज्वला गाडेकर यांच्या हस्ते नगरपंचायत मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
नगराध्यक्षपदी रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड झाल्यानिमित्त पदग्रहण व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी भाजपा नेत्या सोनिया गोरे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लाभल्या तर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही निवड वडूज शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून शहरातील विकासकामांना अधिक गती मिळून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी कामकाज होईल, असा विश्वास सोनिया गोरेंनी यावेळी व्यक्त केला.
माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी वडूजला आता आपणचं स्मार्ट सिटी बनवू, रेखा माळी यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करावं आणि वडूजकरांच्या सेवेचं पुण्य मिळवावं, अशा शब्दांत मत व्यक्त केलं. तर मला नगराध्यक्षपदाची मंत्री जयकुमार गोरेंनी दिलेली संधी खूप मोलाची असून, यामध्ये माझे पती अनिल माळी यांचं मोठं योगदान आहे. मी शहरात प्रभागनिहाय हेल्पलाईन सेवा सुरु करणार आहे. त्याचबरोबर ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ ही संकल्पना अमलात आणणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं,असं आवाहनही नूतन नगराध्यक्षा रेखा माळी यांनी यावेळी केलं.
यावेळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, नियोजन समितीचे माजीं सदस्य नंदकुमार मोरे, अनिल माळी आदिनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जगदाळे यांनी केलं. भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शितोळे, युवानेते विशाल बागल, खटाव तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गोडसे, पंचायत समिती सदस्य प्रसाद जुगदर, तालुका भाजपा उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पंचायत समिती सदस्य हणमंत बोटे, संभाजी गोडसे आप्पासाहेब गोडसे, श्रीकांत देवकर यांच्यासह वडूज नगर पंचायतीचे सर्व माजी नगराध्यक्ष, आजी- माजी नगरसेवक-नगरसेविका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.