
'वसंतराव मानकुमरे यांचे प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य'; श्रीहरी गोळे यांची माहिती
मेढा : जावळी तालुक्यातील हातगेघर सोसायटीच्या ठरावावरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. शासकीय विश्रामगृह सातारा येथे आपल्याला मारहाण अथवा धक्काबुक्की झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केल्याचे सांगत असा कोणताही प्रकार घडलेला नाही. केवळ प्रसिद्धीसाठी चुकीचे वक्तव्य करण्यात आले आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीहरी गोळे यांनी माहिती दिली.
साताऱ्यातील बैठकीदरम्यान हातगेघर धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यासाठी भाजप उद्योग आघाडीचे माजी अध्यक्ष दीपक गावडे यांच्यासह पदाधिकारी आले होते. त्यावेळी वसंतराव मानकुमरे येथे आले. ‘तुम्ही माझ्या ठरावाच्या विरोधात काम केले’, असे सांगून त्यांनी आपल्याशी चर्चा केल्याचा दावा गोळे यांनी केला आहे. मानकुमरे यांनी ‘तू पदावर नसताना पक्षाचे काम का करतोस? असा सवाल केला. त्यावर हा विषय येथे घेऊ नका माझ्यामुळे तुमचा ठराव झालेला नाही. सहा गाव पंचक्रोशीतील सोसायटी सदस्यांच्या विरोधामुळे तुम्हाला सूचक अनुमोदकही मिळाला नाही. असे आपण सांगितल्याचे गोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पक्षाच्या वरिष्ठांनी सामंजस्याने बैठक घेऊन मतभेद मिटवण्याच्या सूचना दिल्या असतानाही मानकुमरे यांनी एकाधिकारशाही करत दमदाठीचा मार्ग अवलंबला तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीशी छुपी युती करून भाजपच्या जागा पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा गंभीर आरोप गोळे यांनी यावेळी केला.
सर्वांनी पक्षाची शिस्त पाळली पाहिजे
दोन्ही बाजूंच्या शाब्दिक चकमकीनंतर संघटनमंत्री विक्रम पावसकर यांनी हस्तक्षेप करत भाजप हा शिस्तीचा पक्ष असून, सर्वांनी पक्षाची शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत सुनावले. त्यानंतर मानकुमरे अपशब्द वापरत तिथून निघून गेल्याचे गोळे यांनी नमूद केले आहे.