फोटो सोजन्य- सोशल मीडिया
भगवान लोके / कणकवली :कणकवली विधानसभा क्षेत्रातील निवडणूक आयोगांने जाहीर केल्यानुसार आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे पोस्टर , बॅनर असतील तर ते स्वत:हून काढावेत, अन्यथा आमची पथके ती बॅनर हटवणार आहेत. उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 ते 29 ऑक्टोंबर या कालावधीत सुट्टींचे दिवस वगळता असणार आहे. कणकवली तहसिल कार्यालयात उमेदवारांसाठी नामर्निदेशन पत्र उपलब्ध असणार आहेत. प्रतिज्ञापत्रातील सर्व मुद्दांवर बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीचे आदर्श पालन करावे अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या.
निवडणूक अधिकारी , कर्मचा-यांनी आपली जबाबदारी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडावी
कणकवली तहसिलदार यांच्या दालनात निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी , कर्मचारी आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे , वैभववाडी तहसिलदार सुर्यकांत पाटील, नायब तहसिलदार मंगेश यादव उपस्थित होते.कणकवली , देवगड , वैभववाडी या तीन्ही तालुक्यांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये असलेले फलकांवर संबंधित अधिका-यांनी 24 तासांत झाकून ठेवावेत. तसेच शहर व गावांमध्ये असलेले राजकीय पक्षांचे पोस्टर , बॅनर 72 तासांच्या आत काढणे बंधनकारक आहे. निवडणूक काळातील संबंधित निवडणूक अधिकारी , कर्मचा-यांनी आपली जबाबदारी अत्यंत पारदर्शकपणे पार पाडावी. संबंधित तयार करण्यात आलेल्या पथकांनी कठोर कारवाई करण्याबाबत सतर्क रहावे . अशा सुचना जगदीश कातकर यांनी दिल्या.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
या विधानसभा मतदार संघातून लढण्यासाठी संभाव्य उमेदवारांना कणकवली तहसिल कार्यालयात नॉमिनेशन पत्र उपलब्ध होतील. अर्जासमवेत आवश्यक असलेले प्रतिज्ञापत्रावरील सर्व कॉलम भरणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्राच्या प्रत्येक पानावर उमेदवाराची सही आवश्यक आहे. उमेदवार राजकीय पक्षाचा असेल तर त्याचा तपशिल आवश्यक आहे. मतदार संघातील उमेदवार असल्यास मतदार यादीच्या पान लावण्याची गरज नाही. उमेदवार बाहेरचा असल्यास मतदार यादीत नाव असल्याबाबत प्रमाणपत्र आवश्यक आहेत. एका उमेदवाराला 4 उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. उमेदवाराचे वय 25 वर्ष आवश्यक आहे. प्राधिकृत अधिका-यासमोर उमेदवाराला शप्पथ घ्यावी लागेल. राजकीय पक्ष फॉर्म ए आणि बी शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करावयाचा आहे. दाखल नामर्निदेशन पत्र व प्रतिज्ञापत्रातील त्रुटी असल्यास नव्याने सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी एक दिवस अगोदर राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये आपले खाते काढणे बंधनकारक आहे. 5 फोटो आवश्यक नामर्निदेशन व शपथपत्र ऑनलाईन भरता येते तरीही कार्यालयात कॉपी जमा करणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त 3 लोकांना व उमेदवार प्रतिनीधीला प्रवेश असेल , कार्यकर्त्यांना 100 मीटर बाहेर थांबवण्यात येणार आहे. उमेदवारांची या निवडणूकीसाठी खर्च मर्यादा 40 लाख असेल, सर्व उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करावे लागेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी सांगितले.