
‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
मीरा-भाईंदरसह मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा व दांडिया कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. असे असतानाच सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘Rent a Garba Partner’ नावाच्या अॅपच्या माध्यमातून कथितरित्या सुरू असलेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेऊन याबाबत निवेदन साद केले.
मेहता यांनी दिलेल्या निवेदनानुसार, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम तसेच अन्य सोशल मीडिया माध्यमांवर ‘Rent a Garba Partner’ या नावाखाली महिला, पुरुष, तरुण आणि तरुणींना गरबा पार्टनर म्हणून उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या जाहिरातींमध्ये कथितरित्या १ हजार रुपयांपासून ६ हजार ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित अॅप, त्याचे मालक, जाहिरात करणारे तसेच या माध्यमातून सेवा देण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी मेहता यांनी केली आहे.
या माध्यमातून विशेषतः महिला आणि नवतरुणींची फसवणूक होण्याची तसेच त्यांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर किंवा ती सार्वजनिक होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा मेहता यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्यास तो तातडीने रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
‘Rent a Garba Partner’ या अॅपच्या माध्यमातून नेमकी कोणती सेवा दिली जाते, त्यासाठी कोणत्या पद्धतीने नोंदणी केली जाते, ग्राहकांकडून कोणती माहिती घेतली जाते आणि सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे स्वरूप काय आहे, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अॅपच्या मालकांबरोबरच त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचीही चौकशी करण्यात यावी. भविष्यात अशा प्रकारच्या अॅपची निर्मिती अथवा जाहिरात करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही मेहता यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत पोलिसांनी विशेषतः महिला आणि नवतरुणींमध्ये जनजागृती करून अशा जाहिरातींना भुलून वैयक्तिक माहिती, फोटो, मोबाईल क्रमांक किंवा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करावे, अशी मागणीही आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून करण्यात आली आहे.