या महिन्यात होणार महापालिका निवडणुका? भाजपच्या बड्या नेत्याने दिले संकेत
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या आहेत. आता राज्यात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. त्यामुळे यावर्षी निवडणुका होतील अशी शक्यता आहे. त्यातचं ओबीसी आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने पाठपुरावा करत आहोत. आगामी महापालिका निवडणुका या एप्रिल किंवा मे महिन्यात होऊ शकतात, असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले.
दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला धु-धु धुतलं आहे, अशी टीका बावनकुळे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर केली आहे. काँग्रेसला लोकांचा विकास कधी कळला नाही, म्हणून त्यांची आज ही दशा झाली आहे. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. केंद्रात आणि राज्यातील डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया देखील बावनकुळे यांनी दिल्लीतील विजयावर दिली आहे.
त्या खात्याचा मंत्री आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचा समन्वय योग्य पद्धतीने व्हावा. त्या खात्यातील भाजपच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जावेत यासाठी तसेच पक्षाचा एक अधिकृत कार्यकर्ता आमच्या मंत्र्यांकडे असावा म्हणून आम्ही आमच्या मंत्र्यांकडे एक सचिव नेमला आहे. मात्र, सध्या तरी हे सचिव फक्त भाजपतील मतदानाकडेच कार्यान्वित असणार आहेत.
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत. एकनाथ शिंदे त्याग करणारे नेते आहेत. २०१९मध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही, आणि स्वतः मात्र बाप-बेटे बसून राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाचं वाटोळ झालं, अशी टीका देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
देशाची राजधानी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा पराभव केला आहे. भाजपच्या त्सुनामीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांसारखे पक्षाचे मोठे चेहरेही पराभूत झाले. दिल्लीत भाजपने ४8 जागा जिंकून स्पष्ट जनादेश मिळवला आहे.