दिल्ली विधानसभेत पराभव झाल्यावर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया (फोटो- ANI)
Delhi Assembly Election Result 2025 :दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 70 जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. दरम्यान दिल्ली विधानसभेत पक्षाला आलेले अपयश आणि स्वतःचा झालेला पराभव यावर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल म्हणाले, “आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीच्या जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो. मी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेने ज्या अपेक्षेने भाजपला विजयी केले आहे, ते त्या अपेक्षा पूर्ण करतील अशी मी आशा व्यक्त करतो.”
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 8, 2025
पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “गेली 10 वर्षे जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्या कार्यकाळात आम्ही खूप कामे केली. आरोग्य , वीज, शिक्षण आणि अन्य क्षेत्रात जनतेला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न केला. जनतेने जो निर्णय दिला आहे, त्यानुसार आम्ही मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडू. लोकांच्या आनंदात, दुखा:त आम्ही सहभागी होऊ. आम्ही राजकारणात सत्तेसाठी आलेलो नव्हतो. तर आम्ही लोकांच्या सेवेसाठी राजकारण हे एक साधन समजत आलो आहोत.
27 वर्षांनी दिल्लीत ‘कमळ’ फुलवलं; PM मोदी साजरा करणार विजयोत्सव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. भाजपने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान भाजपच्या या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी भाजप मुख्यालयात जाणार आहेत. संध्याकाळी ते भाजपच्या कार्यकर्त्याना संबोधित करणार आहेत. दिल्लीत भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली विधानसभेत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून विजयी झालेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र भाजप ऐनवेळी नवीन वेगळी खेळी खेळून दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार का हे पहावे लागेल. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विजय साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात जाण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ते भाजपच्या कार्यकर्त्याना संबोधित करू शकतात.
अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. यावेळी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत आहे. नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे ‘आप’ मोठ्या पराभवाकडे वाटचाल करत आहे. दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. तर काँग्रेसचे संदीप दीक्षित तिसऱ्या स्थानावर राहिले.