शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार आक्रमक; देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर उपोषण सुरु
पिंपरी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. उपोषणात रोहित पवारांसोबत वारकरी आघाडीचे प्रमुख दत्ता महाराज दोन्हे पाटील देखील सहभागी झाले आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जनावरांसह शेती वाहून गेली असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या परिस्थितीत ३२ हजार कोटींचा पॅकेज जाहीर केले, परंतु त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
सरकारला सद्बुद्धी मिळावी
उपोक्षण सुरू करताना रोहित पवार हरिनामाच्या गजरात रमले होते. ते म्हणाले, “जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली होती. आजही या सरकारला तुकोबांची सद्बुद्धी मिळावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी.”
सरकारची फसवी मदत जाहीर
रोहित पवारांनी राज्य सरकारलाही टोला लगावला. त्यांनी सांगितले, “शेतकऱ्यांप्रती सरकारने फसवी मदत जाहीर केली आहे. प्रत्यक्षात याबाबत काही ठोस निर्णय घेतले जात नाहीत. आमचा संघर्ष सुरुच राहील आणि सरकारला गुडघ्यावर आणण्याचा आमचा इरादा आहे.”
अनेक आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्याच्या राजकारणाची सुद्धा चर्चा केली. रोहित पवार म्हणाले, “राज्यात महायुती सरकार असूनही काही पक्षांमध्ये भगदाड सुरू आहे. दिल्लीतून भाजपकडून २०२९ च्या निवडणुकीसाठी वेगळे लढण्याचे आदेश आले आहेत. तोपर्यंत अनेक आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात.”
गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराबाबतही चिंता
उपोषणादरम्यान त्यांनी पुण्यात वाढती गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारामध्ये पुणे महाराष्ट्रात आघाडीवर आहे. गरीब लोकांना वाटत नाही की हे सरकार त्यांच्यासाठी आहे. काही ठराविक व्यक्तींसाठीच हे सरकार काम करत असल्याचे दिसते.” रोहित पवारांचे हे लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारवर दाब निर्माण करण्याचा प्रयत्न मानला जात आहे.