मुंबई : सध्या सर्वत्र विधानसभा व लोकसभा निवडणूकांच्या जागावाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. महायुतीसह महाविकास आघाडी निवडणूकींचा फॉर्मुला ठरवताना दिसत आहे. यामध्ये महाविकासआघाडीमधील शिवसेना व कॉंग्रेसमध्ये अनेक मतदार संघांवरुन रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर ठाकरे गट खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपवर निशाणा साधला आहे. जे. पी नड्डा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला तुम्ही कमळावर लढा असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
जागावाटपाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “मविआची जी चर्चा आहे जागा वाटपाची त्याची चिंता करायची कोणाला गरज नाही. आमची चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे. संपूर्ण देशात जागावाटप अत्यंत संयमाने चर्चा सुरु असेल, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये चालू असेल. कारण आम्ही लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये काम करत आहोत. सर्वांसोबत चर्चा करुनच जागा वाटपाचा तिढा सोडविणार असल्याचा” दावा संजय राऊत यांनी केला. “काल जे. पी नड्डा यांनी अजित पवार आणि शिंदे यांच्या समोर प्रश्न ठेवला आहे, की तुम्ही कमळावर लढा असं म्हटलं आहे. कमलाबाईच्या पदरा खाली लपा असा प्रस्ताव दिला आहे. जे चिन्ह त्यांनी चोरलं त्या चिन्हावर लढायची हिंमत नाही. आणि भाजपला त्यांना त्यांच्या चिन्हावर लढू देण्याच धाडस नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यावर संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील ११ कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजविणार आहेत. अत्यंत चांगलं चिन्ह त्यांना मिळालेलं आहे,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर पाणी टंचाईच्या बैठकीमध्ये अजित पवार, रोहित पवार व सुप्रिया सुळे हे एकत्र दिसल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “अजित पवार पालक मंत्री आहेत सुप्रिया सुळे त्याच भागातून खासदार आहेत. रोहित पवार यांचा ही जवळ मतदार संघ आहे. त्यामुळे ते सर्व शासकीय बैठकीला गेले होते,” असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.