
Sanjay Shirsat News: “मी या विषयावर फक्त जनरल स्टेटमेंट केले आहे. काही लोकांना राजकारणात किडा असतो आणि ते स्वतःला न्यायमूर्ती म्हणून दाखवतात. आता सुरू असलेल्या प्रकरणात त्यांनी बोलले नाही, त्यामुळे मी ट्विट केले आहे. नको त्या वेळी बोलणाऱ्यांनी आता बोलणे आवश्यक आहे; सकारात्मक किंवा नकारात्मक काहीही होत नाही, त्यांनी बोलले पाहिजे.” अशा शब्दांत मंत्री संजय शिरसाट यांनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय शिरसाट यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक ट्विट आहे. या ट्विनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात पत्रकारांनी तुमच्या ट्विटचा संबध अजित पवारांशी आहे का इतर कुणाशी असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, ” प्रत्येक कुटुंबात कौटुंबिक वातावरण असते. हा विषय त्यांच्या कुटुंबातील आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दिग्विजय पाटील यांच्याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, “यावर मी भाष्य करणार नाही. पण या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली आहे आणि त्यांनी यावर बोलले आहे. गुन्हा नोंद झाल्यावर पोलिस कारवाई करतील. पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची माहिती मुख्यमंत्री घेतील, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही शिरसाट यांनी भाष्य केलं. “ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. काही कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवत आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. वैजापूर कन्नड, सिल्लोड, वैजापूर येथील आमचे आमदार आहेत, त्यांचे मत ऐकावे लागेल. भाजपाकडे असलेल्या जागांवर त्यांनीच लढवले पाहिजे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातात.”
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरही शिरसाट यांनी निशाणा साधला आहे. “याचं कोण ऐकणार आहे? ठाकरे यांना टोमणा मारण्याची सवय आहे. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणंघेण नाही, ते राजकारण करत आहेत. हा दौरा शेतकरी दौरा नसून राजकीय चाचपणीचा आहे,” असे त्यांनी नमूद केले.तसेच, उद्धव ठाकरे दगाबाज असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांवर बोलताना शिरसाट म्हणाले, “एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले आहेत. सरकारने दोघांची नार्को टेस्ट करावी. यातून खरं कोण हे जनतेसमोर येईल, सरकारने निर्णय घ्यावा,” असे त्यांनी सुचवले.