Sant Tukaram Maharaj's descendant H.B.P. Shirish Maharaj committed suicide in dehu
पुणे : संत तुकराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. देहूतील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. येत्या 20 फेब्रुवारीला त्यांचे लग्न होणार होते.
देहूमध्ये ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर देखील बांधले होते. खालच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील तर वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी (दि.04) रात्री शिरीष मोरे हे त्यांच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले. दरवाजा वाजल्यानंतर पण दार उघडले जात नव्हते. आतमधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे दार तोडण्यात आले. यावेळी ह.भ.प मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक दृष्ट्या आत्महत्येचे कारण हे आर्थिक विवंचेना असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून पुढील तपास केला जाईल. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी माहिती दिली आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ह.भ.प. शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यातील उल्लेखानुसार तरी आत्महत्येचे कारण हे आर्थिक स्थितीतून असल्याचे दिसत आहे. याबाबत त्यांनी चिठ्ठीमध्ये उल्लेख देखील केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला होता. 20 फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिरीष महाराज मोरे यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचे वंशज, संतवाङमयाचे अभ्यासक-कीर्तनकार, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चरित्राचे व्यासंगी अभ्यासक-व्याख्याते ह.भ.प.श्री. शिरिष महाराज मोरे यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कुटुंबीय आणि स्नेहीजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.ॐ शांति, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे.