
Satara District Bank Election
जिल्हा बँकेची निवडणूक यंदा सुरुवातीपासूनच राजकीय प्रतिष्ठेची बनली होती. महायुतीतील अंतर्गत समीकरणे, नेत्यांचे शक्तिप्रदर्शन आणि स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष यामुळे निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली. मतदानाच्या दिवशीही प्रत्येक मतासाठी नेत्यांच्या यंत्रणा सक्रिय होत्या. विशेषतः कराड, पाटण, माण, महाबळेश्वर आणि फलटणमधील लढतींनी राजकीय वातावरण तापवले होते.
मतदानाच्या आकडेवारीत पाटणने ९८.९९ टक्क्यांसह आघाडी घेतली. साताऱ्यात ९८.७३, कराडमध्ये ९८.२१ टक्के मतदान झाले. कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तालुक्यांनी शंभर टक्के मतदानाचा विक्रम नोंदवला. जावलीत ९४.२०, महाबळेश्वरमध्ये ९०.२०, खटावमध्ये ९६.६६, माणमध्ये ९६.७४ आणि फलटणमध्ये ९६.१९ टक्के मतदान झाले. एकूण मतदानात १ हजार ८१८ पुरुष आणि १६१ महिला मतदारांचा समावेश आहे.
साताऱ्यातील आयटीआय केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केले. भाजपच्या कोअर टीमची उपस्थितीही लक्षवेधी ठरली. शिवेंद्रसिंहराजे उमेदवार नसले, तरी निवडणुकीच्या नियोजनात आणि राजकीय मोर्चेबांधणीत त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. सातारा आणि मेढा येथे भेट देत त्यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.
विक्रमी मतदान म्हणजे सत्ताधारी गटाला समर्थन की प्रस्थापितांविरोधातील नाराजी, यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शंभर टक्के मतदान झालेल्या तालुक्यांतील कौल कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता आहे. कराड-पाटणमधील प्रतिष्ठेच्या लढती आणि माण-महाबळेश्वरमधील मतविभाजन निकालाचे गणित बदलू शकते. मतदानाचा टक्का वाढला म्हणून विजय निश्चित मानण्याची चूक कोणत्याही गटाला परवडणारी नाही. ३ नोव्हेंबरला मतपेट्या उघडल्यानंतरच नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनाचा खरा हिशेब समोर येणार आहे. जिल्हा बँकेच्या सत्तेचा मुकुट कोणाच्या डोक्यावर चढणार, यासाठी आता अवघ्या जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
Ans: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकूण ९७.९२ टक्के मतदान झाले. २ हजार २१ मतदारांपैकी १ हजार ९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Ans: सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी निवडणूक झाली. या जागांसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात होते.
Ans: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.