
Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
मंगळवार तळे ते राजवाडा या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या मार्गालगत तळ्याच्या बाजूला झालेल्या बांधकामांमुळे रस्त्याची जागा कमी झाली होती. तसेच अतिक्रमणांमुळे ऐतिहासिक तळ्याचा दर्शनी भागही झाकोळला गेला होता. परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. पालिकेच्या पथकाने सोमवारी अचानक कारवाई करत संबंधित बांधकामे हटविली. जेसीबीच्या सहाय्याने पक्के बांधकाम पाडण्यात आले, तर टपरीही हटविण्यात आली. त्यामुळे तळ्यालगतची मोकळी जागा पुन्हा खुली झाली आहे.
मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ऐतिहासिक वास्तू आणि जलस्रोतांच्या परिसरात होणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेने सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.