सौजन्य फोटो - सोशल मिडीया
बारामती : तालुक्यातील माळेगाव येथील गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. अनिकेत धुमाळ आणि पप्पू जगताप अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोघांवर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे माळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्याचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हेही वाचा: Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माळेगाव येथील राजहंस चौकात सायंकाळी सुमारे ८.२० वाजण्याच्या सुमारास अनिकेत धुमाळ आणि पप्पू जगताप हे दोघे तरुण थांबले होते. याचवेळी अचानक आलेल्या एका टोळक्याने दोघांना गाठले. सुरुवातीला त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर हल्लेखोरांनी दोन्ही तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच परिस्थिती अधिक गंभीर झाली. हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने अनिकेत आणि पप्पू यांच्यावर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चौकात उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हेही वाचा: Crime News: वांद्रे पूर्व हादरले! चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; ४० वर्षीय संशयित गजाआड
या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने बारामती शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये टोळक्याकडून दोन्ही तरुणांना मारहाण करून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचे दिसत आहे. गजबजलेल्या राजहंस चौकात सायंकाळच्या वेळी हा प्रकार घडल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचाही तपास केला जात आहे. हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






