
फोटो सौजन्य सोशल मीडिया
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पानटपरी चालक आणि मालकांची नशामुक्त भारत अभियानांतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहर आणि परिसरातील काही पानटपऱ्यांमधून बंटा गोळ्या, गुटखा, सिगारेट, गांजाच्या पुड्या, दारू तसेच अन्य नशेच्या पदार्थांची अवैध विक्री आणि साठवणूक होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
अशा पदार्थांची सहज उपलब्धता तरुणांना व्यसनाच्या आहारी नेत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर, कौटुंबिक जीवनावर आणि सामाजिक वातावरणावर होत असल्याने पोलिसांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली आहे.
पानटपरी हा व्यवसाय आहे, नशेचा अड्डा नव्हे, अशा शब्दांत पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी चालकांना स्पष्ट इशारा दिला. दुकानांमध्ये अवैध नशेचे पदार्थ साठवणे, त्यांची विक्री करणे किंवा अल्पवयीन मुलांना व्यसनाधीन करणारे पदार्थ उपलब्ध करून देणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही.
पानटपऱ्यांमध्ये नशा करून युवकांकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्यास किंवा परिसरातील सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्यास संबंधित चालक व मालकांनाही जबाबदार धरले जाईल. अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला.
व्यवसायातून आर्थिक नफा मिळवताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे प्रत्येक व्यावसायिकासाठी आवश्यक आहे. चार पैशांच्या हव्यासापोटी तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले. आपल्या दुकानातून कोणत्याही अवैध नशेच्या पदार्थांची विक्री होणार नाही, तसेच गैरप्रकारांना आश्रय दिला जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक पानटपरी चालकाने घ्यावी.
दरम्यान, पालकांनीही आपल्या मुलांच्या वागणुकीकडे आणि संगतीकडे लक्ष देऊन त्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले. तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांकडून अशा गैरप्रकारांविरोधात कठोर भूमिका कायम ठेवली जाणार असल्याचे निलेश तांबे यांनी स्पष्ट केले.