Satara rise in temperature deforestation and unplanned administration increase in pollution
अनिल कदम / उंब्रज : कधी नव्हे ते सातारा जिल्हा सध्या तापमान वाढीसाठी विदर्भ नागपूर बरोबर स्पर्धा करू लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे.सर्वत्र एकच चर्चा आहे की यावेळी सूर्यदेव कोपले असून भयानक उन्हाळा पडला आहे. परंतु यासाठी जिल्ह्यातील नागरिक प्रशासन आणि अधिकारी कारणीभूत आहेत. महाबळेश्वर,पाटण,जावळी सारखे डोंगराळ आणि थंड हवेची ठिकाणे असताना जिल्हा ४२℃ पार करत असेल तर नक्कीच निसर्गावरील मानवी अतिक्रमण मानव जातीला संकटाच्या खाईत लोटणारे ठरत आहे नदी व नाल्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केले जात आहेत. सिमेंटच्या जंगलाने निसर्गावर अतिक्रमण सुरू आहे. महामार्ग विस्तारीकरण करीत असताना हजारो झाडांच्या कत्तली केल्या जात आहेत. शहरीकरणाच्या बाजारात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वाढते तापमान विनाशाची पहिली पायरी ठरणार आहे.
पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना महत्त्वाची
एकेकाळी सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना गावोगावी जनजागृती करीत होती परंतु आधुनिकीकरण स्वीकारत असताना घराघरातील पाणी बंदीस्त नाल्यातून वाहू लागल्याने पाणी जिरण्याचे प्रमाण अत्यल्प झाले यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली तर आसपासची हिरवळ पुरेशा पाण्याअभावी नेस्तनाबूत झाली. यामुळे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सारखे प्रकल्प सिमेंट काँक्रीटच्या घरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अवलंबले तरच भविष्यात जमिनीची पाण्याअभावी होणारी धूप थांबणार असून यामुळे तापमान नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे.
बेसुमार वृक्षतोड धोक्याची
पुणे बेंगळुरू महामार्ग विस्तारीकरण होत असताना लगतची उभी असणारी महाकाय झाडे क्षणात आडवी केली होती. लाकूड तोडणाऱ्या व्यापाऱ्यांनी कोणतीही तमा न बाळगता सपासप झाडे तोडण्याच्या सपाटा लावला होता. सध्या सुरू असणारा शेंद्रे ते कागल दरम्यानचा महामार्ग भकास आणि बोडका दिसत असून तीव्र उन्हाच्या झळा लागत असताना नागरिकांना शोधून सुद्धा झाडांचा आसरा मिळत नाही. यामुळे दळणवळण महत्त्वाचे आहे. परंतु निसर्गाचा समतोल सुद्धा साधने गरजेचे बनले आहे. यामुळे बेसुमार वृक्षतोड धोक्याची
असून भविष्यात मोठे संकट निर्माण होणार असल्याची चाहूल या निमित्तानं लागली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नियोजनशून्य प्रशासन
कोणत्याही ऋतूमध्ये सातारा जिल्ह्यातील वातावरण आल्हाददायक असते. असा समज आजपर्यंत तरी देशात विदेशात होता यासाठी ‘एक्स सर्व्हीस मेन सिटी’ असा शिक्काही जिल्ह्याला बसला होता. शांत आणि संयमी जिल्हा तसेच वातावरण सुद्धा सुंदर यामुळे वयाच्या साठीनंतर आयुष्यच्या उत्तरार्धात उत्तम निसर्ग असावा हीच वयोवृद्ध नागरिकांची अपेक्षा असते. पुणे मुंबई किंवा मोठी शहरे सोडून सातारा हीच पसंती होती. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभाराने बेसुमार वृक्षतोड, डोंगरांचे सपाटीकरण, अमर्याद गौण खनिज उपसा आणि पर्यावरण विभागाची डोळेझाक यामुळे प्रदूषण वाढीला लागून तापमान वाढ झाली आहे.
शासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत
नियमांची मोडतोड करून जिल्ह्यातील कार्यकाळात वारेमाप संपत्ती जमवण्याच्या नादात शासकीय अधिकारी अनेक चुकीच्या बाबींना खतपाणी घालत असतात यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला जात आहे प्लॅस्टिक बंदी,कचऱ्याचे निर्मूलन, नदी प्रदूषण अशा कळीच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दोन तीन वर्षांचा कार्यकाळ चिरीमिरी कमावून पार पाडायचा एवढा एकच उद्देश सध्या प्रचलित होताना दिसत आहे कोणीही अधिकारी प्रामाणिकपणे पर्यावरनाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देत नाही परिणामी तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आजच्या घडीला चाळीस बेचाळीस असणारे तापमान भविष्यात पन्नाशी गाठेल त्यावेळी मानव जातीला जगणे मुश्किल होणार असून प्राणी पशु पक्षी याचे अस्तित्व संपून जाणार आहे माणसाने निसर्गावर अतिक्रमण केल्याने हे भीषण परिणाम जाणवत आहे यामुळे वेळीच सावध नाही झाल्यास विनाश अटळ आहे आणि याला जबाबदार तुम्ही आम्हीच आहे दुसरे तिसरे कोणीही नसणार आहे.