केंद्र सरकारच्या जातीय जनगणनेसाठी पुणे काँग्रेस मोहन जोशी यांचा उत्सव (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे – केंद्र सरकारकडून जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची विरोधक असलेल्या कॉंग्रेस पक्षाने जातीनिहाय जनगणनेची जोरदार मागणी केली होती. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या पदयात्रेमध्ये देखील हा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर आता जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर कॉंग्रेस नेत्यांनी देशभरामध्ये आनंदोत्सव साजर करण्यात येत आहे. पुण्यातील कॉंग्रेस नेत्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचे निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला असला तरी, त्याचे श्रेय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनाच आहे, असे प्रतिपादन माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले आहे.
पुण्यामध्ये कॉंग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मोठा उत्साह दिसून आला. महात्मा फुले वाडा येथे मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तो विजय जल्लोषात साजरा केला. यावेळी पेढे वाटण्यात आले, महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला. ‘झुकता है मोदी, झुकानेवाला राहुल गांधी चाहिये’, ‘सामाजिक न्यायक्रांतीचे नवे जननायक राहुल गांधी’ अशा घोषणांचे फलक हाती घेऊन ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी या घोषणा दिल्या. प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रशांत सुरसे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.जातीनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधी यांचा विजय आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, “जातीनिहाय जनगणना व्हावी, याकरिता गेली १० वर्षे राहुल गांधी संसदेत तसेच वेगवेगळ्या व्यासपीठांवर मागणी करत होते. भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी या मागणीची अवहेलना केली. खालच्या पातळीवर जाऊन तयांच्यावर टीका केली. पण, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला राहुल गांधी यांच्यापुढे झुकावे लागले. सर्वसामान्य जनतेची बाजू राहुल यांनी नेहमीच घेतली आहे आणि ते पुढेही घेतील, असे मत माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नांदेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. जातीनिहाय जनगणनेबाबत झिरवाळ म्हणाले की, “जातनिहाय जनगणना व्हावी ही बऱ्याच दिवसांची मागणी आहे. जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण व्हावे, होऊ नये असे दोन्ही मतप्रवाह होते. जनगणना ही 2011 साली झाली. 2011 च्या नंतर जनगणना झाली नाही. जनगणना व्हावीच कारण जनगणनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावं लागतं. म्हणून जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो योग्यचं आहे,” असे मत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले आहे.