
Kas Pathar, Satara News, Kaas Plateau, Maharashtra Tourism
सलग तिन्ही दिवस आरक्षित असणारे तीन हजार पर्यटकांचे ऑनलाईन बुकिंग अगोदरच फुल्ल झाले होते. पण एकाच वेळी अनेक पर्यटक थेट पठारावर दाखल झाले. अचानक आलेल्या पर्यटकांनी ऑफलाईन तिकीट घेऊन पठारावर प्रवेश मिळवला. तीन दिवसांत वीस हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी कासवर हजेरी लावल्याने पठारावर जत्रेचे स्वरूप आले होते.
तिन्ही दिवस आलेल्या हजारो पर्यटकांची गैरसोय होणार नाही याकडे वनविभागाने व वनसमितीने अजिबात लक्षच दिले नसल्याने मोठी वाहतूक कोंडी झालेली पाह्ययला मिळाली.पार्कींग करण्यास जागा ही अपुरी पडली तर फुलांच्या ठिकाणी आत सोडण्यास लांब लचक लाइन पर्यटनकांची लागली होती.
कासवर सद्या लाल गुलाबी तेरडा चांगलाच बहरला असून पठार लाल, गुलाबी, निळे, जांभळे दिसत आहे. त्याचबरोबर मिकी माऊस, कंदील पुष्प, सोनकी, चवर, गेंद, निळी जांभळी मंजिरी, पाचगणी आमरी आदींसह काही किटकभक्षी फुलांच्या दुर्मिळ प्रजाती ही पठारावर आल्या आहेत.
प्रसिद्ध अशा कुमुदिनी तलावातील पांढरी कमळे उमलायला सुरूवात झाली असून पर्यटकांचे लोंढे इकडे आकर्षित होत आहेत.
राजमार्गावर असणारा कुमुदिनी तलाव थोडा लांब असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची सोय करण्यात आली आहे. शंभर रूपये प्रति व्यक्ती तिकिट घेऊन पर्यटकांना इलेक्ट्रिक वाहनांची सफर घडत आहे. यावर्षी विकसित केलेल्या विविध नवीन पाॅंइटवर ही गर्दी दिसत आहे. मंडपघळ या नवीन पर्यटन पाॅंइटवर विशेष गर्दी होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने कास पठारावरील फुलांच्या आयुष्यात घट होणार आहे. कास पठार हे कातळ खडकाचे असून पठारावर मातीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे ओलावा धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यात पावसाची विश्रांती आणि कडक ऊन यामुळे पठारावरील जैवविविधता लवकर वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नेहमी पेक्षा पठारावरील फुले लवकर निरोप घेण्याची शक्यता दिसत आहे.