भारत- पाकिस्तान तणावावरुन शरद पवारांची मोठी प्रतिक्रीया; म्हणाले, आता अतिरेक्यांच्या...
सातारा : भारताने कधीही अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन दिलेले नाही. पाकिस्तानने केलेल्या आगळीकीमुळे युद्धजन्य परिस्थिती ओढवली आहे. अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होतात त्यामुळेच आपल्याला काय घडले आहे ? हे कळू शकते म्हणून आज आपण सरकारच्या पाठीशी शांततेचा पुरस्कार करणारे लोक ठामपणे उभे आहोत, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले पाकिस्तानने आरंभलेल्या उचापतींमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्य व अधिकारी अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. भारताने कधीही अतिरेकी चळवळीला प्रोत्साहन दिले नाही. आपल्यावर जर हल्ले झाले तर आपण आपल्या रक्षणाची खबरदारी घ्यायला पाहिजे. आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत म्हणूनच केंद्रातील समन्वय समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडी देशाच्या हितासाठी ठामपणे सत्ताधाऱ्यांबरोबर उभी राहिली आहे. संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना संरक्षण खात्यामध्ये नऊ टक्के महिलांची भरती व्हावी असा निर्णय आम्ही घेतला होता. त्याचाच परिणाम म्हणून आज महिला ब्रिगेड लष्करात अत्यंत मानाने उभ्या आहेत आणि तडफदारपणे लष्करी कारवायांमध्ये भाग घेत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी बेळगावच्या सून आणि सिंदूर ऑपरेशनच्या मुख्य कर्नल सोफिया कुरेशी यांच्या धाडसाचा सुद्धा पवार यांनी उल्लेख केला
रयतचा शिक्षक हा रयतेचा केंद्रबिंदू आहे गुणवत्ता आणि कौशल्य वाढवण्यासाठी प्रत्येक शाखेत विविध उपक्रम राबवले जातात. आज गुणवत्ता वाढवणे हे आपल्या समोरील आव्हान आहे. विज्ञान युगाला सामोरे जाण्याची ताकत आजच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया असे आवाहन पवार यांनी बोलताना केले. जात लिंग धर्म यांचा विचार न करता कर्मवीरांनी सर्व तळागाळातल्या वंचितांना शिक्षण दिले. आज भारत वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. एकसंघ उभ्या राहणाऱ्या भारतासाठी धर्मनिरपेक्ष विचार करणाऱ्या पिढीची गरज आहे, असेही ते म्हणाले .
चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी भविष्यातील ध्येय धोरणांचा आढावा घेतला. रयत मासिकांचे प्रकाशन इंजिनिअरिंग कॉलेजला सेंटर ऑफ एक्सलन्स ची स्थापना रिसर्च अँड डेव्हलपमेंट स्वतंत्र विभाग सक्षम शाखेकडून दुर्बल शाखांना 15 टक्के निधीची मदत इत्यादी निर्णयाची त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. यावेळी थोर देणगीदार कर्मवीर पारितोषिक विजेते शाखा यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, जागतिक मराठी अकादमीचे गौरव फुटाणे, रयत मासिकाचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुधीर भोंगळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार व वितरणाचे निवेदन उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.