मुंबई – दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या घरी तसेच ७ राज्यांत आज सीबीआयने धाडी टाकल्या. त्यामुळे भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना दडपण्यासाठी करत असल्याचा आरोप पुन्हा विरोधकांनी केला आहे. अशात राजकीय वातावरण तापलेले असताना महाराष्ट्रातदेखील सीबीआयबाबत शिंदे-फडणवीस सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सध्या सीबीआयला थेट तपास करण्यास बंदी आहे. मविआ सरकारनेच २१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा निर्णय घेतला होता. त्यानूसार केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यास बंदी घालण्यात आली होती. तपास करायचा असेलच तर त्यासाठी राज्य सरकराची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, राज्यात पुन्हा भाजप-शिंदे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यात सीबीआयला पुन्हा थेट तपास करण्याचे अधिकार दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. असे झाल्यास महाराष्ट्रात विरोधकांपुढील अडचणी वाढणार आहे.