मुंबई – शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी राजकारणात अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. नरेंद्र मोदींना मतं देऊ नका, अशी मुस्लिमांना भीती दाखवली जात आहे. अनेक गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहेत.
मिठाईमुळे प्रकल्प बारगळला
भरसभेमध्ये रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले. रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे लबाड लांडगा आहे. त्यांनी मराठी माणसाला फसवले. मला फसवले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूपसला आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, तसेच ज्याने मिठाई दिली त्यांनाच उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदे दिल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. कोकाकोला प्रोजेक्ट आणण्यात माझे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या माध्यमातून केवळ 40 दिवसात मी हा प्रोजेक्ट कोकणात आणला. हा प्रोजेक्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुभाष देसाई उद्योग मंत्री असतानाच यायला हवा होता. पण मिठाईमुळे प्रकल्प बारगळला. कंपनी सोबत चर्चा होताना आधी आम्हाला भेटा असे सांगण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.
तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना
रामदास कदम यांनी कालपर्यंत सूर्यकांत दळवी यांच्यावर टीका केली होती. पण आज भरसभेतून त्यांची प्रशंसा केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सूर्यकांत दळवी यांच्यासोबतच्या वादावर रामदास कदम यांनी मिश्किल भाष्यही केलं. तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना अशी आपली स्थिती आहे, असं रामदास कदम म्हणाले.