
सर्व प्रभागातील सर्व गटातून लढण्याची आमची तयारी, पण...; रवींद्र धंगेकरांनी स्पष्टच सांगितलं
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत धंगेकर बोलत होते. महिला विभागाच्या सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, उपशहर प्रमुख नितीन पवार, शहर सचिव संदीप शिंदे, हवेली तालुका प्रमुख नमेश बाबर आदी उपस्थित होते. पक्षातर्फे निशु:ल्क अर्जवाटप केले जात असून, शुक्रवारपर्यंत अर्ज दिले जातील. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारल्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपल्या लोकसंख्येत युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. युवकांना राजकीय क्षेत्रात येऊन काहीतरी करून दाखवायचे आहे. सर्वत्र नेत्यांच्या नातलगांनाच उमेदवारी दिली जात असल्याने ते हतबल झाले आहेत. एकूणच राजकीय क्षेत्रातून सर्वसामान्य हद्दपार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच शिवसेना युवकांना केंद्रबिंदू मानून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. युवकच शहराचे भवितव्य घडवणार आहेत. त्यामुळे पुढील २५-३० वर्षाचे शहराचे भवितव्य घडविण्यासाठी पक्षातर्फे अधिकाधिक युवकांनाच उमेदवारी दिली जाईल,’ असे धंगेकर यांनी स्पष्ट केले.
गैरकारभाराविरोधात उठवणार आवाज
पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यावर वचक राहिलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांकडून जनतेची लूट होत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. याविरोधात शिवसेना आवाज उठवेल. पालिकेतील भ्रष्टाचार आम्ही उघड करू. आमचा नागरिककेंद्री जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल, असेही रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट केले.