विजय शिवतारे यांची अजित पवारांवर पुन्हा टीका; नेमकं काय म्हणाले?
पुणे : राज्य शासनाच्या पुनरुत्थान योजनेतून लोकसंख्येच्या आधारावर मिळणाऱ्या निधीपैकी सर्वाधिक निधी बारामती नगरपरिषदेकडे नेला, महाविकास आघाडीच्या काळातील घडामोडींचा दाखला देत आमदार विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. पुणे येथे झालेल्या ‘पुणे महापालिका विभाजन – काळाची गरज’ या परिसंवादात ते बोलत होते.
शिवतारे म्हणाले, पुणे जिल्ह्याला मिळालेल्या पुनरुत्थान योजनेतील निधीपैकी केवळ २० कोटी रुपये पुणे महापालिकेला देण्यात आले, तर तब्बल २७० कोटी रुपये बारामती नगर परिषदेला मिळाले. लोकसंख्येच्या आधारे सर्वाधिक निधी पुणे महापालिकेला मिळायला हवा होता, पण तो बारामतीकडे अजित पवारांनी नेला, असा आरोपही त्यांनी केला.
या निधी संदर्भात पुण्यातील नागरिक, नेते आवाज उठेवणार आहेत की नाही? असा सवाल त्यांनी केला. फायनान्स कमिटी नेमण्याची मागणीही परिसंवादात नागरिकांनी केली. त्यावर फायनान्स कमिटी सोडा फायनान्स मिनिस्टरच निधी घेऊन गेले, असे शिवतारे म्हटल्यावर सभागृहात हशा पिकला.
पायाभूत सुविधांचा प्रश्न अनुत्तरित
शहरविकासासाठी महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांकडून कोट्यवधी रुपयांचे कर संकलन झाले असले, तरी त्या गावांना आवश्यक सुविधा पुरवण्यात आलेल्या नव्हत्या. असा आरोपही त्यांनी यावेळी केला. माझ्या मतदारसंघातील ११ गावांकडून १३६९ कोटी रुपये कलेक्शन झाले; पण केवळ ३०० कोटीही खर्च झाले नाहीत. मग या गावांचा समावेश फक्त कर वसुलीसाठी केला का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुणे महापालिकेचे विभाजन आवश्यक : शिवतारे
शिवतारे यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाचा पुनरुच्चार करताना सांगितले की, विकासासाठी महापालिकेचे विभाजन हे काळाची गरज आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, प्रशासकीय सहकार्य आणि कायद्यातील अमूलाग्र बदल आवश्यक आहेत.