कल्याण : पालकमंत्री हरविले आहेत, कल्याणला येताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पालकमंत्र्यांना घेऊन यावे, असा बॅनर कल्याण काँग्रेसने लावून भाजप-शिवसेनेला डिवचले होते. आता या बॅनरबाजीवर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ‘विनाकारण लूडबूड करु नका. गपचूप जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले मुख्यमंत्र्यांकडून कामे करुन घेतात. त्यानंतर असे कृत्य करुन दुटप्पीपणा करतात, पण असे का?’ असा सवाल आमदार भोईर यांनी उपस्थित केला.
कल्याणमध्ये 19 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहे. त्यांची जाहीरसभा होणार आहे. या सभेच्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने शहरात बॅनर लावले आहे. या बॅनरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत आहे. मात्र, येताना पालकमंत्र्यांना सोबत घेऊन या असे आवाहन केले. पालकमंत्री शंभूराजे देसाई हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर अद्याप आलेले नाही. त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती लावली आहे. मात्र, दौरा झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसने बॅनरबाजी करत शिवसेना-भाजपला डिवचले आहे.
यानंतर आमदार भोईर यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले आहे. पालकमंत्री हरविले नाहीत. त्यांच्याकडे ठाणे आणि साताराचा चार्ज आहे. एखाद्या वेळेस ठाण्याला कमी वेळ देत असतील. पण हरविलेले नाही. त्यांना वेळ कमी मिळत आहे. इतर वेळेस ते कमी भेटत असतील. हे आपण मान्य करतो. नियोजन समितीच्या बैठकांना ते असतात. जे काम करतात त्यांच्या कामात विनाकारण लूडबूड करु नका.
राज्याचा विकासाचा ध्यास मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी घेतला आहे. त्यांच्याकडून काम करुन घ्यावे. मुख्यमंत्री हे कामाची व्यक्ती आहे. मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले गपचूप आपल्या कामांसाठी सह्या घेण्यासाठी येतात. त्यामुळे दुटप्पी भूमिका घेऊ नये, असे भोईर यांनी सांगितले.