मुंबई – लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सुरु असून अनेक गंभीर आरोप एकमेकांवर केले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप करत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये नेत्यांना मुद्दाम अटक करत असल्याचा आरोप केला आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोन टॅपिंगचा देखील आरोप केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर अटकेचा दबाव
संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री यांची एक मुलाखत समोर आली आहे, सध्याचे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे यांची सरकार फडणवीस,आशिष शेलार,प्रवीण दरेकर यांना अटक करत होती. पण का करत होती अटक? काहीतरी त्यांनी केले असेलच ना कोणीही कारणाशिवाय कोणाला अटक करते का ? व्यक्ती नाही तर सरकार कारवाई करते. एकनाथ शिंदे यांनी सांगावे की त्यांना नरेंद्र मोदी यांचे सरकार का अटक करणार होते? एकनाथ शिंदे यांच्यावर अटकेचा दबाव होता,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.
फडणवीस यांच्या हुकूमावरून रश्मी शुक्ला तेव्हा…
पुढे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. राऊत म्हणाले,“देवेंद्र फडणवीस हे अपराधी होते. त्यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप होता. देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली. फडणवीस यांच्या हुकूमावरून रश्मी शुक्ला तेव्हा त्या खात्याच्या प्रमुख होत्या, त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यांमध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते याची त्यांना भीती होती,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
ही लोकं कायद्याच्या पेक्षा मोठी आहेत का ?
“प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक घोटाळ्याचा आरोप होता त्याची चौकशी सुरू होती. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर ,शेलार, प्रसाद लाड हे लोकं कायद्याच्या दृष्टीने अनटचेबल आहेत का ? यांना कोणी हात लावू शकत नाही का? कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही ते काही कायद्याच्या वर आहेत का ? या देशात प्रधानमंत्री यांच्यावर कारवाई झाली आहे, राज्यपाल यांच्यावर देखील कारवाई झाली आहे. दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना मोदी सरकारने अटक केली आहे अनेक मंत्री आमदार व खासदार यांना महाराष्ट्रात आणि देशभरात अटक झाली आहे. मग हे पंचक आहेत, ज्यांची नावे शिंदे यांनी घेतली आहेत. त्यांच्यावर अपराध असतील आणि सरकार त्याची चौकशी करत असेल तर त्यांचा तीळ पापड का व्हावा ?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.