Firing of youth after being fired
पुणे : पुण्यातील (Pune Crime )विश्रांतवाडी परिसरात दारूच्या नशेत एका हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरातच पिस्तूलाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, याच व्यक्तीकडून २०१६ मध्ये देखील मिस फायर झाले होते. सुदैवाने या घटनेत जखमी वा जिवीत हानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सुरेश शंकरराव धापटे (वय ४२) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश हे हॉटेल व्यावसायिक असून, त्यांचे विश्रांतवाडी परिसरातच रेस्टो अँड बार आहे. त्यांच्याकडे परवाना असणारे पिस्तूल आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पिस्तूल बाळगतात. दरम्यान, त्यांनी दुपारी मद्याच्या नशेत राहत्या घरातच गोळीबार केला. त्यामुळे खळबळ उडाली. अचानक झालेल्या या आवाजाने शेजारचे लोक देखील घाबरून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सुरेश यांच्याकडून २०१६ मध्ये देखील मिस फायर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत पोलिस सुत्रांनी सांगितले की, अशाच प्रकारे त्याने यापुर्वी देखील गोळीबार केला होता. त्यावेळी देखील सुदैवाने जखमी वा जीवितहानी झालेली नव्हती. अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.






