जालना : शहरातील संभाजीनगर भागात बंदुकीच्या धाकाने रोख रकमेसह सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल लुटण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.25) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन अज्ञात चोराविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील संभाजीनगरमध्ये निखिल सखाराम सारडा (३२) यांचे घर आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास 24 वर्षे वयोगटातील तीन तरुण निखिल सारडा यांच्या घरात घुसले व बंदुकीचा धाक दाखवून सारडा यांच्या पत्नी प्रग्या व आई चंदाबाई सारडा मारहाण करण्यात आली.
त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत दीड लाख रुपये रोख रकमेसह, सोन्याच्या तीन साखळ्या, तीन सोन्याच्या अंगठ्या, कानातील फुलांचे जोड, चार सोन्याच्या बांगड्या, तसेच नामांकित कंपनीचे तीन महागडे मोबाईल असा नऊ लाख साठ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.