सिंधुदुर्गात पाणीटंचाईची चाहूल? नितेश राणेंचे प्रशासनाला मोठे निर्देश
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास तातडीने पाणी उपलब्ध करून देता यावं, यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. धरणांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांसह वाड्या-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणी निश्चिती समितीच्या बैठकीपूर्वी पूर्व बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थिती, उपलब्ध पाणीस्रोत आणि संभाव्य पाणीटंचाईबाबत माहिती दिली. दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता पी. एन. पाटील यांनी जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्प, उपलब्ध पाणीसाठा आणि आकस्मिक पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत सादरीकरण केलं.
ज्या गावांना किंवा शहरांना भविष्यात आकस्मिक पिण्याच्या पाण्याची गरज भासू शकते, त्यांनी त्याबाबतची मागणी तातडीने नोंदवावी, असे निर्देश देण्यात आले. धरणांच्या लाभक्षेत्राबाहेरील गावांना गरजेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरसह इतर तात्पुरत्या उपाययोजनांचा अंदाज घेऊन त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगण्यात आलं आहे.
MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा विभाग आणि नगर प्रशासन विभागाने या उपाययोजनांचे अंदाजपत्रक येत्या १५ दिवसांत प्रशासनाकडे सादर करावं, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
दरम्यान, जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यांचाही पाणीटंचाईच्या नियोजनात समावेश व्हावा, यासाठी ग्रामपंचायतींना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. २ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या ग्रामसभांमध्ये पाणीटंचाईचा आढावा घेऊन टंचाई आराखडे अंतिम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आराखडे १० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा परिषदेकडे सादर करण्याच्या सूचना आहेत.
आवश्यकता भासल्यास विशेष ग्रामसभा घेऊन टंचाई आराखड्यावर चर्चा करून मंजुरीची कार्यवाही करण्यासही सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यातील एकही वाडी अथवा वस्ती टंचाई आराखड्यापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाचं पाणी संकलित करणं, स्थानिक जलस्रोत मजबूत करणं आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या काळात तात्पुरत्या उपाययोजनांसोबतच शाश्वत पाणी व्यवस्थापनावरही प्रशासनाचा भर राहणार आहे.






