पारंपरिक आकाश कंदीलांना पुन्हा उजाळा; पर्यावरणपूरक, साधेपण अन् कलाकुसरीच्या सजावटींना नागरिकांची पसंती
पुणे/ प्रगती करंबेळकर : दीपावलीच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, बाजारपेठांमध्ये आकाश कंदीलांची खरेदी उत्साहात सुरू आहे. दिवाळी साजरी करण्याचा अविभाज्य भाग असलेल्या आकाश कंदीलांच्या खरेदीकडे यंदा विशेष लक्ष वेधले जात आहे. काही वर्षांच्या आधुनिक ट्रेंडनंतर नागरिक पुन्हा पारंपरिक षटकोनी आकाश कंदीलांकडे वळले आहेत. या आकाश कंदीलांची किंमत ३०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत असून पर्यावरणपूरक, साधेपण जपणारे आणि विशिष्ट कलाकुसर असलेले हे कंदील यावर्षी विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
लक्ष्मी रोड, तुळशीबाग, रविवार पेठ तसेच उपनगरांतील बाजारपेठा सध्या उजळून निघाल्या आहेत. दिवाळीच्या सजावटींसाठी केवळ दिवे आणि फुलांच्या माळांवरच नाही, तर नव्या प्रकारच्या आकर्षक वस्तूंवरही ग्राहकांचा ओघ वाढला आहे. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या या वस्तूंमध्ये मातीचे दिवे, हस्तनिर्मित आकाश कंदील, कागदी तोरणे आणि बांबूच्या सजावटीच्या वस्तू प्रमुख आहेत.
विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांपूर्वी बाजारपेठेत फोल्डेबल आकाश कंदीलांचा दबदबा होता. मात्र आता नागरिक पुन्हा पारंपरिक कापडी व कागदी आकाश कंदीलांकडे वळले आहेत. त्यामुळे अशा फोल्डेबल कंदीलांची मागणी लक्षणीय घटली असून, बाजारात ते क्वचितच दिसतात.
देव देवतांच्या, महापुरुषांच्या प्रतिमांवरील आकाश कंदीलांचे आकर्षण
पारंपरिक कंदीलांसह यंदा एक नवीन आकर्षण म्हणजे देव देवता महापुरुषांच्या प्रतिमांसह आकाश कंदील. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी समर्थ, तसेच कृष्ण-राधा यांच्या प्रतिमा असलेले आकाश कंदील पुणेकरांना भावत आहेत. या कंदीलांची किंमत ९०० रुपयांपासून ते ४००० रुपयांपर्यंत असून साध्या ते थ्रीडी प्रतिमांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. या नवनवीन डिझाइन्समुळे आकाश कंदील फक्त प्रकाशाचे प्रतीक न राहता सांस्कृतिक ओळखीचे द्योतक बनले आहेत.
घरगुती आकाश कंदील बनवण्याचा ट्रेंड अजूनही जिवंत
तंत्रज्ञानाच्या आणि रेडीमेड वस्तूंच्या युगातही काही घरांमध्ये आजही घरगुती आकाश कंदील बनवण्याची परंपरा कायम आहे. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मिळून दिवाळीच्या काही दिवस आधी कंदील बनवतात. विविध विषयांवर, चालू घडामोडींवर आणि संकल्पनेवर आधारित आकाश कंदील तयार केले जात आहेत.
पर्यावरणपूरक सजावटींकडे नागरिकांचा कल
या वर्षी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड ठळकपणे दिसून येत आहे. कागद, बांबू, ज्यूट आणि नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली तोरणे, वॉल हँगिंग, टेबल डेकोर यांसारख्या वस्तूंना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरकतेसोबत स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी अनेक नागरिक स्वदेशी बनावटीच्या सजावटींची निवड करत आहेत.
पूर्वी वापरला जाणारा षटकोनी आकाश कंदील काही काळासाठी कालबाह्य होईल, असे वाटले होते. मात्र मागील पाच-सहा वर्षांत नागरिक पुन्हा पारंपरिक आकाश कंदीलांकडे वळले आहेत. हे कंदील प्रामुख्याने कापडी पिशव्या आणि कागद वापरून बनवले जातात. इतर कंदीलांच्या तुलनेत हे ५०० ते ६०० रुपयांनी स्वस्त पडतात. – महेश डाल्या, विक्रेते आर. के. फेटेवाले