(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम सुरू असताना वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सिद्धेश्वर बाबर यांच्या निदर्शनास एक पाच वर्षांची चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत एकटीच फिरताना आली. त्यांनी तातडीने तिला सुरक्षितपणे पोलिस चौकीत आणले. चिमुकली घाबरलेली असल्याने पोलिस निरीक्षक दीपक पाटील आणि सिद्धेश्वर बाबर यांनी तिला प्रथम खाऊ देत धीर दिला आणि आपुलकीने विचारपूस केली.
चिमुकलीला घराचा पत्ता किंवा पालकांचा मोबाईल क्रमांक सांगता येत नसल्याने तिच्या पालकांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. यावेळी सिद्धेश्वर बाबर यांनी चिमुकलीचा फोटो काढून आवाहनासह तो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केला.
काही मिनिटांतच हा फोटो विविध व्हॉट्सअॅप ग्रुप आणि स्थानिक डिजिटल नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अखेर हे स्टेटस चिमुकलीच्या पालकांपर्यंत पोहोचले आणि तिची आई तातडीने पोलिस चौकीत दाखल झाली.
आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू
आवश्यक खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. मुलीला सुखरूप पाहताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेनंतर मोहोळ पोलिसांच्या समयसूचकतेचे, संवेदनशीलतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर बाबर यांनी दाखवलेली तत्परता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला प्रभावी वापर यामुळे हरवलेल्या चिमुकलीला काही तासांतच तिच्या कुटुंबाशी पुन्हा भेट घडली. या घटनेनंतर नागरिकांनी “पोलिस हेच जनतेचे खरे मित्र” असल्याची भावना व्यक्त केली.
ही घटना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर केल्यास तो केवळ संवादाचे माध्यम न राहता संकटात मदतीचा हात ठरू शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली.






