(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bigg Boss 20 Promo: लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 20‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, नव्या पर्वाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच निर्मात्यांनी शोचा फर्स्ट लूक लोगो आणि टीझर प्रदर्शित केला. त्यानंतर आता सोशल मीडियावर ‘बिग बॉस 20’च्या सेटचा कथित फोटो व्हायरल झाला असून, संभाव्य स्पर्धकांच्या नावांचीही जोरदार चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये ‘बिग बॉस’चा प्रसिद्ध डोळा दिसत असून, हा फोटो शोच्या नव्या घराचा असल्याचा दावा केला जात आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान ‘बिग बॉस’च्या घरात नव्हे, तर एका आखाड्यात उभा असल्याचे दिसते. “यावेळी स्पर्धकांना मिळणार एक वरदान… तथास्तू मेरी जान,” असा संवाद तो प्रोमोमध्ये म्हणताना दिसतो. मात्र, या झलकने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यंदा ‘बिग बॉस’चे पारंपरिक घर असणार की स्पर्धकांसाठी खास आखाडा उभारला जाणार?
मंगळवारी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सलमान खान पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसले. या टीझरमध्ये त्यांनी ‘करण-अर्जुन’चा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. काही चाहत्यांनी यावरून शाहरुख खानही शोमध्ये विशेष उपस्थिती लावणार का, असा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
View this post on Instagram
दरम्यान, शोमधील संभाव्य स्पर्धक म्हणून क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि अभिनेत्री जेनिफर विंगेट यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. जेनिफर विंगेटला यापूर्वीही अनेकदा शोसाठी संपर्क करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी प्रत्येक वेळी सहभागी होण्यास नकार दिला होता. यंदा त्या शोमध्ये दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
मात्र, या दोघांच्या सहभागाबाबतही अद्याप निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
The Paradise Teaser: 20 कोटी व्ह्यूजनंतर ‘द पॅराडाइज’चा टीझर रिलीज; नानीचा दमदार अंदाज पुन्हा चर्चेत
‘बिग बॉस 20’चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. शोचे भाग दररोज प्रथम JioHotstar वर रात्री 9 वाजता आणि त्यानंतर Colors TV वर रात्री 10.30 वाजता प्रसारित केले जाणार आहेत. नव्या थीम, संभाव्य स्पर्धक आणि मोठ्या ट्विस्टमुळे यंदाचा सीझन अधिक रंगतदार ठरणार असल्याची चर्चा आहे.






