थकबाकीदारांना महावितरणची दिवाळी भेट! व्याज, दंड १०० टक्के माफ; पंढरपूरचे ग्राहक होणार थकबाकीमुक्त
Solapur News: वर्षानुवर्षे वीजबिलांची थकबाकी डोक्यावर घेऊन वीजजोडणी खंडित झालेल्या पंढरपूर तालुक्यातील ग्राहकांसाठी महावितरणने दिवाळीची मोठी भेट दिली आहे. थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना आता दिलासा मिळणार आहे. महावितरणच्या ‘अभय योजना २०२६-२७’ अंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार असून, मूळे थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या ग्राहकांच्या घरात पुन्हा विजेचा प्रकाश येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने ही योजना जाहीर केली आहे.(फोटो सौजन्य – AI)
६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत योजनेची अमलबजावणी होणार आहे. पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील पात्र घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर लाभ घेता येणार आहे. मात्र, नळपाणीपुरवठा योजनांना यातून वगळण्यात आले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा झालेल्या ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीमुळे वीजजोडणी गमावलेल्या ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
योजनेच्या प्रारंभापासून १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मूळ थकबाकी एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड’ सवलत मिळणार आहे. लघुदाब घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी तीन वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळेल. इतर लघुदाब, उच्चदाब ग्राहकांना १० आणि १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
एकरकमी थकबाकी भरणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठीही महावितरणने दिलासा दिला आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येणार आहे. उच्चदाब ग्राहकांनाही थकबाकीनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंजूर भार २० किलोवॉटपर्यंत असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीवेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारल्यास मूळ थकबाकीत अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. पुनर्जोडणी शुल्क. लघुदाब ग्राहकांचे सर्व्हिस कनेक्शन शुल्क माफ करण्यात येणार आहे.
८८ पढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला या तीन तालुक्यांतील तब्बल ३१ हजार ५७२ ग्राहकांकडे सुमारे १८ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. या ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीमुक्त होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा.






