
कुरिअरपेक्षा स्पीड पोस्टालाच पसंती! विश्वासार्हता कायम; ग्रामीण भागात पोस्टसेवेला वाढती मागणी
Amravati: वेगवान आणि आधुनिक सेवांच्या युगात खासगी कुरिअर कंपन्यांची स्पर्धा वाढली असली, तरी भारतीय टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट सेवेकडे नागरिकांचा कल पुन्हा वाढताना दिसत आहे. कमी खर्च, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले व्यापक जाळे आणि सरकारी विश्वासार्हता यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांकडूनही महत्त्वाची कागदपत्रे, पार्सल आणि विविध वस्तू पाठविण्यासाठी पोस्टाला प्राधान्य दिले जात आहे. अमरावती जिल्ह्यात टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक कार्यालय जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अमरावती आणि परतवाडा येथे दोन हेड पोस्ट ऑफिस असून, ग्रामीण भागात तब्बल ४६९ पोस्ट कार्यालयांचे जाळे आहे. त्यामध्ये ४१४ लहान आणि ५५ मोठ्या पोस्ट कार्यालयांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील या कार्यालयांमध्ये बुकिंगपासून वितरणापर्यंतची विविध कामे केली जातात. जिल्ह्यात पोस्टमनची १३० पदे असून, ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयांमध्ये कर्मचारी विविध सेवा सांभाळतात.(फोटो सौजन्य – istock)
खासगी कुरिअर कंपन्यांप्रमाणेच टपाल विभागानेही आपल्या सेवांचा विस्तार केला. कोअर बँकिंग, स्पीड पोस्ट, पार्सल, आंतरराष्ट्रीय पार्सल, आधार कार्ड, पासपोर्ट आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांसोबतच नागरिकांच्या विविध गरजा पूर्ण केल्या जात आहेत. तसेच परदेशातील नागरिकांपर्यंत गंगाजल पोहोचविण्याची सेवाही टपाल विभागाकडून दिली जाते. रक्षाबंधनाच्या काळात बहिणींच्या राखी वेळेत भावांपर्यंत पोहोचविण्याचे कामही पोस्टाने केले.
जिल्हा मुख्यालयापासून वस्तीपर्यंत पोहोचणारे टपाल विभागाचे जाळे देशापुरते मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय टपाल सेवांच्या माध्यमातून १३० देशांपर्यंत भारतीय पोस्टची सेवा पोहोचत आहे.८ खासगी दुरिअर कंपन्यांशी स्पर्धा सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार केला. ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले व्यापक जाळे, कमी खर्च आणि नागरिकांचा कायम असलेला विश्वास यामुळे स्पीड पोस्ट व पार्सल सेवांना पुन्हा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरगुती उद्योग आणि नवउद्योजकांना देश-विदेशात उत्पादने पाठविण्यासाठी सीओडीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या धर्तीवर टपाल विभागाने कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) सेवाही उपलब्ध करून दिली आहे. गत आठवड्यात या सेवेंतर्गत बडनेरा येथून नेपाळला मोठ्या मालाची पाठवणी करण्यात आली. घरगुती उद्योग, स्वयंरोजगार किंवा आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून तयार केलेली उत्पादने देशभरात किंवा परदेशात पाठविणाऱ्या नवउद्योजकांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरत आहे.
२ हेड पोस्ट ऑफिस
४६९ एकूण पोस्ट कार्यालये
४१४ ग्रामीण भागातील लहान पोस्ट कार्यालये
५५ मोठी पोस्ट कार्यालये
१३० पोस्टमनची पदे
१३० आंतरराष्ट्रीय टपाल सेवा असलेले देश