
आमदार आशुतोष काळेंचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
अहिल्यानगर मधील कोपरगाव मतदारसंघातील अनेक ठिकाणी सुरु असलेली रस्त्यांची कामे अतिशय धीम्या गतीने सुरु असून, काही ठिकाणी मंजूर झालेली कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर परतीच्या पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, तसेच तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांचा सुरू असलेला गळीत हंगाम लक्षात घेता, वाहतुकीची समस्या अधिक वाढू नये म्हणून आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्यांच्या कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एका पंचवार्षिकात दोन मोठ्या रस्त्यांसाठी तब्बल ४२३ कोटींचा निधी मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
सावळीविहीर – कोपरगाव (राष्ट्रीय महामार्ग) या ११ किलोमीटर रस्त्यासाठी ₹१९१ कोटी
देर्डे फाटा – भरवस फाटा (राज्य मार्ग क्र.७) या रस्त्यासाठी ₹२३२ कोटी निधी मिळविण्यात आला आहे.
मात्र देर्डे फाटा – भरवस फाटा रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने आमदार काळे यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांकडून अडचणी जाणून घेतल्या आणि आवश्यक ती सुधारणा तत्काळ करण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान आमदार काळे म्हणाले, “सावळीविहीर–कोपरगाव रस्त्यावर दोन ठिकाणी रखडलेली कामे आणि देर्डे फाटा–भरवस फाटा रस्त्याचे संथ काम यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून कामांची गती वाढवावी.”
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. वर्षे, उपकार्यकारी अभियंता वर्षराज शिंदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी ए. एल. जमाले, अभियंते पी. पी. गायकवाड, अक्षय शिंदे, व्ही. व्ही. पालवे, आर. पी. गंभीरे, आर. ए. जाधव, व्ही. व्ही. माने आदी अधिकारी उपस्थित होते.
तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.