
फोटो सौजन्य: iStock
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिल्याने, कोणत्या निवडणुका आधी होतील, जिल्हा परिषद आणि नगरपालिका एकत्र जाहीर होतील का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र आयोगाने आज केवळ नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्याने छोट्या शहरांतील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, पाथर्डी, श्रीगोंदे, राहुरी, देवळाली प्रवरा (नगर परिषद), शिर्डी, जामखेड, नेवासे, शेवगाव (नगर पंचायत)
या निवडणुका श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर यांसारख्या मोठ्या नगर परिषदांसह नेवासे, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदे, शिर्डी, राहाता, राहुरी आणि देवळाली प्रवरा येथे होत आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण पूर्वीच जाहीर झाले असल्याने आता प्रत्येक प्रभागात मोर्चेबांधणीला वेग येत आहे.
काही ठिकाणी सोशल मीडियावरून उमेदवारी जाहीर करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निवडताना पक्ष आणि नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण प्रवर्गात इच्छुकांची रांग मोठी असून, मागासवर्गीय आरक्षण असलेल्या ठिकाणीदेखील स्पर्धा वाढली आहे.
याशिवाय पक्षांतराचे लोणही काही ठिकाणी दिसू लागले आहे. जुने विरुद्ध नवे, स्थानिक गटबाजी, तसेच उमेदवारीच्या चढाओढीत संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर होणारी ही पहिलीच मोठी सार्वजनिक निवडणूक असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. देश-राज्यातील विरोधी पक्षांनी मतदारयादीवर घेतलेल्या आक्षेपांचे सावटही या निवडणुकीवर राहणार आहे.