मुंबईतील रुग्णालयांमध्ये ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान 'स्वच्छता पंधरवडा' (Photo Credit - X)
मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य सेवांच्या अनुषंगाने अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव मिळावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ६ ते २० नोव्हेंबर २०२५ दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये ‘स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे.
या संपूर्ण मोहिमेनंतर सर्व संस्थांचे मूल्यांकन व श्रेणीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नवकल्पना आणि सार्वजनिक सहभाग या निकषांवर आधारित मूल्यांकनानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना गौरवपत्र, प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.
मुंबई पालिकेच्या आरोग्य सेवांशी संबंधित विश्वासाला बळकटीकरण मिळावे या दृष्टीने रुग्णालयातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सुंदर वातावरण राखण्याचे निर्देश मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्या दृष्टीने आयोजित या स्वच्छता पंधरवड्याचा उद्देश हा आरोग्य संस्थांमधील स्वच्छता पातळी उंचावणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे, संक्रमण नियंत्रणावर भर देणे तसेच कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे, हा आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत रुग्णालय कार्यालय, वसतिगृहे, चौक्या, उपहारगृहे, भांडारकक्ष (स्टोअर), रुग्णालय अंतर्गत पदपथ आदी याठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यासोबतच निर्जंतुकीकरण, कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्था, शून्य राडारोडा, भंगार यावर लक्ष केंद्रीत करुन कार्यवाही केली जाईल. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, कर्मचाऱ्यांमार्फत संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित सहायक आयुक्त, विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभाग, परिरक्षण विभाग, कीटकनियंत्रण विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, उद्यान विभाग आदींची मदत घेण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांचे अधीक्षक, वैद्यकीय अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
मुंबई पालिकेच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचवण्याच्या अनुषंगाने एकत्रितपणे ही मोहीम राबवण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत. स्वच्छता मोहिमेच्या यशासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य क्षेत्रातील सर्व रुग्णालये, संस्था, विभागातील विद्यमान मनुष्यबळ आणि उपलब्ध संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करून मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी केले आहे.






