
STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय,
ST News : महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.
महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. एसटीच्या बसस्थानकांवर मातृत्वाला आवश्यक असलेली संवेदनशीलता आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत सहकार्य करणार आहे. सामंजस्य करारानुसार राज्यातील एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत.
या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासोबतच आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचाही समावेश प्रकल्पात करण्यात आला आहे.
सामंजस्य करारामधील नियोजनानुसार तीन आर्थिक वर्षांत एकूण १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात २०२६-२७ : ५० कक्ष, २०२७-२८ : ५० कक्ष आणि २०२८-२९ : २५ कक्ष उभारले जातील.
सीएसआर धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजेनुसार या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून सुमारे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून देणे, आवश्यक वीज, पाणी आणि स्थापनेसाठी सहकार्य करणे तसेच आवश्यक शासकीय परवानग्या मिळविणे अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण होऊन साहित्य व सुविधा महामंडळाकडे हस्तांतरित झाल्यानंतर कक्षांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी एसटीची राहणार आहे.
विशेष म्हणजे, सामंजस्य करारामध्ये या प्रकल्पासाठी एसटीकडून कोणतेही आर्थिक योगदान राहणार नाही. टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर उपक्रमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांच्या सन्मानात आणि प्रवासाच्या अनुभवात निश्चितच सकारात्मक भर पडणार आहे.
‘हिरकणी कक्ष’ हा केवळ एक सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले संवेदनशील पाऊल ठरणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.