(Photo - X)
Jaykumar Rawal : कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हटलं की आतापर्यंत डोळ्यासमोर शेतमालाची आवक, लिलाव आणि विक्रीचं चित्र उभं राहतं. मात्र आता या बाजार समित्यांना रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेची नवी दिशा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे.
२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी १ हजार ठिकाणी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार आहेत. युवकांना रोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी बाजार समिती स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जयकुमार रावल यांनी बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी बाजार समित्यांनी केवळ शेतमालाच्या व्यवहारापुरतं मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम करावं, असं सांगितलं.
शेतमालावर प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. ट्रक ड्रायव्हिंगपासून आधुनिक लॉजिस्टिक्स आणि अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत युवकांना विविध कौशल्याधारित संधी उपलब्ध करून देता येतील, असं रावल यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राचा शेतमाल फक्त राज्यातील बाजारपेठेत न राहता देशभर आणि पुढे जगातील प्रमुख शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासाठी प्रक्रिया, योग्य साठवणूक, वाहतूक, आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रँडिंग यांची सांगड घालावी लागणार आहे.
रोजगार महाकुंभासाठी बाजार समित्यांनी आवश्यक ठिकाणी स्टॉल उभारावेत, विविध उद्योग आणि रोजगारदात्यांना सहभागी करून घ्यावं, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि रोजगाराच्या संधींची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी, अशा सूचना रावल यांनी दिल्या.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या उपक्रमासाठी बाजार समित्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. एकूणच, बाजार समिती म्हणजे फक्त माल विक्रीचं ठिकाण नाही, तर रोजगार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचं मोठं केंद्र बनू शकतं, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे.






