भाडे वाढल्यामुळे एसटीचे प्रवासी घटले (File Photo : ST Bus)
अकोला : एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे मागील मार्च महिन्याच्या पहिल्या दोन हप्त्याच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्येत प्रतिदिन तीन लाखांची घट झाल्याची माहिती आहे. महायुती सरकारच्या काळात एसटीने भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाकडून तत्काळ श्वेतपत्रिका काढून सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची मागणीही करण्यात आली.
परिवहन मंत्री यांना दिलेल्या निवेदनात सांगितले, एसटीची एकूण थकीत देणी 7 हजार कोटींच्यावर गेली असून, प्रलंबित थकीत रक्कम देण्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे. या क्रमात एसटीने 14.95 टक्के इतकी भाडेवाढ केली. परंतु, मागील वर्षाची 1 मार्च ते 18 मार्चची एकूण आकडेवारी व त्याच कालावधीतील यंदाची आकडेवारी तपासली तर भाडेवाढीच्या नंतर ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांप्रमाणे दिवसांचे सरासरी उत्पन्न 31 कोटी 74 लाख इतके यायला हवे.
प्रत्यक्षात मात्र दररोज सरासरी 27 कोटी 66 लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले आहे. त्याच प्रमाणे मागील वर्षी याच काळात प्रवासी संख्या प्रतिदिन 41 लाख इतकी होती. त्यात प्रतिदिन 3 लाखांनी घट झाली असून ती प्रतिदिन 38 लाखांवर आली आहे. अजूनही दिवसाला साधारण 4 कोटी रुपये इतकी रक्कम कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ भाडेवाढ करूनही अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून शासनाचेच यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेकडून व्यक्त केल्या जात आहे.